रेल्वेचा एसी प्रवास महागणार; प्रवाशांना यूजर फी द्यावी लागणार

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 September 2020

रेल्वे नवी दिल्ली आणि मुंबईती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या डेव्हलपमेंटसाठी खासगी कंपन्यांकडून टेंडर मागत आहे. यूजर फीचा निर्णय झाल्यास रेल्वे स्टेशनच्या डेव्हलपमेंटसाठी ठराविक निधी निश्चित होणार आहे.

नवी दिल्ली - रेल्वेच्या मोठ्या स्टेशन्सवर आता पॅसेंजरना यूजर फी द्यावी लागणार आहे. अर्थातच एसीमधून प्रवास करणाऱ्यांना या यूजर फीचा जास्त भुर्दंड असणार आहे. स्लीपरच्या प्रवाशांसाठी ही यूजर फी नाममात्र असल्याचं सांगितलं जात असलं तरी त्यांनाही यूजर फी द्यावीच लागणार आहे.

किती असणार यूजर फी?
या संदर्भात टाईम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने बातमी प्रसिद्ध केली आहे. सध्या रेल्वे मंत्रालय यूजर फी संदर्भात एक प्रस्ताव तयार करत आहे. त्यात कमीत कमी यूजर फी ही 10 रुपये असण्याची शक्यता आहे. जनरल पॅसेंजर आणि उपनगरीय रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांकडून यूजर फी घ्यावी की त्यांना यात सवलत द्यावी, या विषयी सध्या संभ्रम असून, त्यावर उच्चस्तरीय चर्चा सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

फर्स्ट क्लास एसीमधून प्रवास करणाऱ्यांना 30 रुपये यूजर फी असण्याची शक्यता आहे. 2-टीयर आणि 3-टीयरमधली प्रवाशांसाठी यूजर फी अर्थातच थोडी कमी असेल आणि स्लिपर क्लाससाठी ती नाममात्र असेल, अशी शक्यता आहे. त्यामुळे एसीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेच्या वाढीव तिकिटासोबत यूजर फी द्यावी लागणार आहे. यूजर फी रेल्वेच्या तिकिटातच समाविष्ट असणार का? याबाबत अद्याप अनिश्चितता आहे.

हे वाचा - देशात 1 ऑक्टोबरपासून नवे नियम; बेकरी पदार्थ,वाहतूक नियम ते विमा पॉलिसीत होणार बदल

टेंडर फी कशासाठी?
यूजर फीमुळे सामान्य नागरिकांना कोणतिही अडचण येणार नाही, असा दावा रेल्वे बोर्डाचे सीईओ आणि अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी केलाय. पुढील महिन्यात रेल्वेच्या यूजर फी संदर्भात अध्यादेश काढला जाण्याची शक्यता आहे. रेल्वे नवी दिल्ली आणि मुंबईती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या डेव्हलपमेंटसाठी खासगी कंपन्यांकडून टेंडर मागत आहे. हे टेंडर भरण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर आहे. त्यापूर्वी यूजर फी संदर्भात रेल्वे निर्णय घेण्याची शक्यता आहे. यूजर फीचा निर्णय झाल्यास रेल्वे स्टेशनच्या डेव्हलपमेंटसाठी ठराविक निधी निश्चित होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Railway proposals Pay user fees to ac train

टॉपिकस
Topic Tags: