गांधी जयंतीदिनी रेल्वे होणार शाकाहारी!

पीटीआय
सोमवार, 21 मे 2018

बापूंचे तिकीटही येणार 


रेल्वेचे म्हणणे आहे की, पहिल्या टप्प्यात 2018 ते 2022 पर्यंत दोन ऑक्‍टोबरला रेल्वेत मांसाहारी पदार्थ बंद राहतील. त्याचा प्रतिसाद पाहून दर वर्षी ही प्रथा चालू ठेवण्याबाबत विचार करता येईल. 2018 व 2019मध्ये गांधी जयंतीला विकल्या जाणाऱ्या तिकिटांवर बापूजीचे छायाचित्र छापण्याचाही प्रस्ताव रेल्वेने दिला आहे. 
 

नवी दिल्ली -  शाकाहाराचे खंबीर पुरस्कर्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीला तुम्ही रेल्वेने प्रवास करणार असाल तर तुम्हाला संपूर्ण शाकाहारी बनावे लागेल. कारण, त्या दिवशी म्हणजे दोन ऑक्‍टोबरला कोणत्याही रेल्वे गाडीत किंवा स्थानकांवर मांसाहरी खाद्यपदार्थ उपलब्ध नसतील. रेल्वेने हा मांसाहार बंदीचा प्रस्ताव संस्कृती मंत्रालयाकडे दिला आहे. तो मंजूर झाल्यावर यंदापासून गांधी जयंती ही राष्ट्रीय स्वच्छता दिनाबरोबरच राष्ट्रीय शाकाहार दिन म्हणून साजरी केली जाण्याची, परिणामी मांसाहारी प्रवासी बांधवांसाठीही गांधी जयंती "ड्राय डे' ठरण्याची चिन्हे आहेत. 

गांधीजींच्या 150व्या जयंतीचा धडाका उडवून देण्याचा मोदी सरकारचा विचार आहे. हा मुहूर्त 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतरचा असला तरी तो आपल्याच राजवटीत साजरा होईल, अशा जबर विश्‍वासाने मोदी सरकारने त्याची तयारी चालू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतीच मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावून दीडशेव्या गांधी जयंती सोहळ्याबाबत त्यांच्या सूचना मागविल्या. तसेच, रेल्वेसह अन्य मंत्रालयांकडूनही कल्पना मागविण्यात आल्या. 

हा सोहळा संस्कृती मंत्रालयांतर्गत साजरा होणार असल्याने साऱ्यांनी त्यांच्याकडेच सूचना पाठवायच्या आहेत. रेल्वेने पाठविलेल्या सूचनेत प्रस्तावित "शाकाहार दिनाची' रुजवात केलेली दिसते. 

"स्वच्छता एक्‍स्प्रेस' 
पुढची गांधी जयंती सर्वार्थाने "स्पेशल' बनविण्यासाठी या दिवशी "विशेष सॉल्ट रेक' व "स्वच्छता एक्‍स्प्रेस' चालविण्याचीही रेल्वेची कल्पना आहे. साबरमतीपासून सुटून महात्मा गांधींचा पदस्पर्श झालेल्या देशाच्या सर्व प्रमुख ठिकाणांना ही गाडी भेट देईल. यानिमित्ताने पर्यटनालाही चालना मिळेल, असा रेल्वेचा दावा आहे. 

 

Web Title: Railways plans veg only menu for Gandhi Jayanti