महाराष्ट्रानंतर आता दक्षिणेत पावसाचा कहर; केरळ व कर्नाटकमधील मृतांची संख्या 66 वर

वृत्तसंस्था
Sunday, 11 August 2019

केरळमध्ये कोझिकोड आणि मलप्पुरम जिल्ह्यात गुरुवारपासून (ता. 8) पावसामुळे 20 नागरिकांचा, तर वायनाडमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी दिली.

तिरुअनंतपुरम : केरळमध्ये धुवाधार पाऊस आणि भूस्खलनाच्या घटना सुरूच असून, बळींची संख्या शनिवारी (ता.10) 42 वर पोचली आहे. एक लाख लोकांना निवारा केंद्रात हलविण्यात आले. कर्नाटकमध्ये पूरस्थिती गंभीर असून, पावसामुळे 24 जणांचा मृत्यू झाला आहे. कारवारमध्ये दरड कोसळल्याने कोकण रेल्वेच्या सर्व गाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत. 

केरळमध्ये कोझिकोड आणि मलप्पुरम जिल्ह्यात गुरुवारपासून (ता. 8) पावसामुळे 20 नागरिकांचा, तर वायनाडमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी दिली. राज्यात सुमारे 988 निवारा केंद्रे उभारली असून, एक लाख सात हजार 699 नागरिकांना तेथे हलविण्यात आले आहे. वायनाड जिल्ह्यातील स्थिती अत्यंत वाईट असून तेथील 24 हजार 990 नागरिकांनी निवारण केंद्रात आसरा घेतला आहे. वायनाड आणि मलप्पुरम जिल्ह्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून, त्याच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे काम शुक्रवारी (ता. 9) रात्री थांबविण्यात आले होते. आज सकाळी ते पुन्हा सुरू करण्यात आले. पावसामुळे वायनाडमधील मदतकार्यात अडथळा येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सेवा रविवारी (ता. 11) दुपारी 12 पासून सुरू होणार आहे. विमानतळाच्या काही भागांत आलेले पुराचे पाणी ओसरले असून स्वच्छतेस सुरवात झाली आहे. विमानतळ उड्डाणासाठी सज्ज असून विमान कंपन्यांना सेवा सुरू करण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती 'कोचिन इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड'च्या प्रवक्‍त्याने दिली. 

केरळमधील नुकसान 
- वायनाडमधील पुतुमला येथे दरड कोसळून अनेक घरे व इमारती, मंदिरे गाडली गेली 
- सात जणांचे मृतदेह सापडले 
- एक हजार जणांची सुटका 
- 15 रहिवासी बेपत्ता असल्याची उपजिल्हाधिकारी एन.एस.के. उमेश यांची माहिती 
- लष्कर आणि 'एडीआरएफ'चे बचत कार्य सुरू 

मृतांची संख्या 42 
निवारा केंद्रे  988 
स्थलांतरित नागरिक  1,07,699 

राहुल गांधींचा आज केरळ दौरा? 
कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी हे वायनाड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. तेथील पुराची पाहणी करण्यासाठी आणि पूरग्रस्तांना भेटण्यासाठी ते वायनाडला रविवारी (ता. 11) जाण्याची शक्‍यता आहे. ''मी उद्या केरळला जाण्याची शक्‍यता आहे. तेथील मदतकार्यात काही अडथळे येणार नसतील तरच मी जाणार आहे. तेथे माझा दोन दिवस मुक्काम असेल. पंतप्रधान, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याशी मी चर्चा केली असून, पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत देण्याचा माझा प्रयत्न आहे. तेथील कॉंग्रेस कार्यकर्त्यांशीही मी चर्चा केली आहे,'' अशी माहिती राहुल गांधी यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rainfall in the south India Above 66 people dead in Kerala and Karnataka