राजस्थानात लग्न मंडपावर भिंत कोसळून 24 जण ठार

यूएनआय
गुरुवार, 11 मे 2017

वादळी पावसामुळे घडली दुर्घटना; राज्य सरकार चौकशी करणार

भरतपूर, (राजस्थान), ता.11 (यूएनआय) : येथे वादळी पावसामुळे मंगल कार्यालयाची भिंत कोसळून झालेल्या अपघातामध्ये 24 जण ठार झाले, तर अन्य 40 जण जखमी झाले आहेत. बुधवारी रात्री ही दुर्घटना घडली. भिंत कोसळली तेव्हा मंडपामध्ये लग्न समारंभ सुरू होता. मृतांमध्ये वरपक्षाच्या नातेवाइकांचा समावेश आहे. राजस्थान सरकारने या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून, मंगल कार्यालयाच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या मंगल कार्यालयाचा मालक अटकेच्या भीतीने फरारी झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, ज्या मंगल कार्यालयामध्ये ही दुर्घटना घडली, त्या कार्यालयास भरतपूर महानगरपालिकेची परवानगी मिळाली नव्हती. या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी तीन वेगवेगळ्या समित्यांची स्थापना करण्यात आली असल्याचे आरोग्यमंत्री कालिचरण सराफ यांनी सांगितले. यातील एक समिती दुर्घटनेची चौकशी करेल, दुसरी शहरामधील सर्व मंगल कार्यालयांमध्ये सुरक्षेच्या योग्य उपाययोजना करण्यात आल्या आहेत किंवा नाही, याची पडताळणी करेल. दुर्घटनेतील जखमींवर रुग्णालयामध्ये योग्य उपचार केले गेले की नाही, याची तपासणी तिसरी समिती करेल, असे एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.

मान्यवरांचा शोक
पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरराजे, माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आदी नेत्यांनी या दुर्घटनेनंतर शोक व्यक्त केला. राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाइकांना 2 लाख, तर जखमींना 50 हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली आहे. केंद्र सरकारनेही एवढीच रक्कम नुकसानभरपाई म्हणून जाहीर केली आहे. जिल्हा प्रशासनानेही मृतांच्या नातेवाइकांना 50 हजार, तर जखमींना दहा हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Web Title: rajasthan: 25 dead wedding hall collapses