esakal | भाजपची नाव बुडण्यापासून वाचवता येणार नाही; नेत्यांनी दिला घरचा आहेर
sakal

बोलून बातमी शोधा

bjp rajsthan congress election

 राजस्थानमध्ये 20 जिल्ह्यातील 90 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यामध्ये 48 जागा सत्ताधारी काँग्रेसनं तर 37 जागांवर भाजपनं बाजी मारली आहे. 

भाजपची नाव बुडण्यापासून वाचवता येणार नाही; नेत्यांनी दिला घरचा आहेर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जयपूर - राजस्थानमध्ये 20 जिल्ह्यातील 90 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यामध्ये 48 जागा सत्ताधारी काँग्रेसनं तर 37 जागांवर भाजपनं बाजी मारली आहे. या निकालानंतर राजस्थानच्या भाजप नेत्यानं घरचा आहेर दिला आहे. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे निकटवर्तीय असलेल्या भाजप नेत्यांच्या एका गटाने हाडौती इथं झालेल्या पराभवाला पक्षाच्या राज्य संघटनेला जबाबदार ठरवलं आहे. 

भाजप नेत्यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी करून वरिष्ठ नेत्यांना एक सावधानतेचा इशाराच दिला आहे. नेत्यांनी म्हटलं की, विशिष्ट व्यक्तींच्या तालावर नाचण्यामुळे भाजप बुडण्याच्या मार्गावर आहे. असंच सुरु राहिलं तर भाजपची नाव बुडण्यापासून कोणी वाचवू शकणार नाही. संयुक्त पत्र प्रसिद्ध करणाऱ्या नेत्यांमधे आमदार प्रताप सिंह सिंघवी, माजी आमदार बाबूलाल वर्मा, भवानी सिंह राजावत, प्रल्हाद गुंजल, विद्या शंकर नंदवाना आणि भाजप नेते किशन पाटीदार यांचा समावेश आहे.

हे वाचा - ट्रम्प यांच्याविरोधातील दुसऱ्या महाभियोगास सुरवात; आजपासून होतेय सुनावणी

काँग्रेसचा भाजपच्या गडाला सुरुंग
कोटा, बूंदी, बारां आणि झालावाड जिल्ह्यात झालेल्या नगर परिषद आणि नगर पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसनं भाजपला मोठा दणका दिला. यानंतर भाजपच्या प्रदेश नेत्यांनी म्हटलं की, पक्षाला राजेंच्या झालावाड जिल्ह्यात विजय मिळवू शकते. पण विशिष्ट व्यक्तींच्या इशाऱ्यावर प्रदेशात काहीच काम आणि जनाधार नसलेल्या नेत्यांना निवडणूक प्रभारी करण्यात आलं आहे. तिकीट वाटपात मनमानी कारभार केला गेला. त्यामुळेच अशी अवस्था झाली. नाहीतर राजस्थानमध्ये कोटा भाजपचा अभेद्य गढ आहे असं मानलं जात होतं. त्याच गडाला काँग्रेसनं सुरुंग लावला आहे. 

भाजप नेत्यांची चिंता
भाजपच्या नेत्यांनी चिंता व्यक्त करताना म्हटलं की, कोटाच्या उत्तर आणि दक्षिण दोन्ही नगर पालिकेत भाजपचा पराभव करून काँग्रेसनं विजयी पताका फडकावली. तर बूंदीमध्ये जिल्ह्याचा अध्यक्ष करू शकलो नाही असं त्यांनी म्हटलं. तर कोटा, बारां जिल्ह्यातील रामगंजमंडी, कैथून, सांगोद, बारां, मांगरोल, अंता यासह बूंदि, केवरायपाटन, कापरेन, लाखेरी, नैनवा, इंद्रगढमध्येही भाजपचा पराभव झाला. 

हे वाचा - सरकार नेमतंय ऑनलाइन स्वयंसेवक; सोशल मीडियावर ठेवणार नजर

भाजपच्या अंतर्गत भांडणाचा काँग्रेसला फायदा
काँग्रेसच्या प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षांनी म्हटलं होतं की, भाजप त्यांच्या अंतर्गत भांडणात अडकून पडले आहे. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांकडे त्यांचं लक्ष नाही. आधीच्या निवडणुकीत भाजप 60 ठिकाणी सत्तेत होतं आता त्यांच्याकडे फक्त 37 जागा उरल्या आहेत. तर काँग्रेसनं मुसंडी मारत 48 ठिकाणी सत्ता मिळवली आहे. तसंच दोन नगर पालिकांमध्ये काँग्रेसच्या पाठिंब्याने अध्यक्ष बनला आहे.