मंदीर पाडल्याची चिथावणीखोर माहिती; पत्रकाराच्या अटकेसाठी पोलिसांचं पथक घरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aman Chopra

मंदीर पाडल्याची चिथावणीखोर माहिती; पत्रकाराच्या अटकेसाठी पोलिसांचं पथक घरी

जयपूर : राजस्थानमध्ये टीव्ही पत्रकार अमन चोप्रा (Journalist Aman Chopra) यांना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक त्यांच्या घरी पोहोचले आहे. त्यांच्यावर दोन समाजातील भावना भडकवल्याचा आणि तेढ निर्माण केल्याचा आरोप असून यासंदर्भातील तीन गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या अटकेनंतर त्यांना कोर्टाने जामीन दिला होता पण एका स्थानिक कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना अटक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

(Order to Arrest TV Journalist Aman Chopra)

दिल्लीतील जहांगीरपुरीमध्ये झालेल्या हिंसेनंतर राजस्थानमधील राजगढ येथे ३०० वर्ष जुने शिवमंदीर पाडण्यात आलं होतं. त्यासंदर्भात चुकीची माहिती सांगितल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. राजस्थानमधील डुंगरपूर पोलिसांनी सांगितलं की, त्यांच्यावर अलवार जिल्ह्यातील मंदीर पाडल्याची माहिती देताना समाजाचे माथे भडकावल्याचे आरोप आहेत. त्यांनी राजस्थान सरकारने दिल्लीतील जहांगीरपुरी येथे झालेल्या हिंसेचा बदला म्हणून कारवाई केल्याची माहिती टीव्हीवर दिली होती. यावरुन एका व्यक्तीने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

२३ एप्रिलला त्यांच्या विरोधात बुंदी आणि अलवार जिल्ह्यात याप्रकरणी तीन तक्रारी दाखल झाल्या असून देशद्रोह, धार्मिक भावना भडकावणे, दोन गटांत वैर वाढवणे अशा कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यावर त्यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर राजस्थान उच्च न्यायालयाकडून त्यांना जामीन मिळाला होता पण डुंगरपूरमधील येथील स्थानिक कोर्टाने त्यांच्या विरुद्ध अटक वॉरंट काढलं आहे.

स्थानिक कोर्टाने अटक वॉरंट काढल्यावर पोलिसांचे पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी घरी पोहोचले असता त्यांच्या घराला कुलूप असल्याचं पोलिसांना आढळलं आहे. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यासाठी डुंगरपूर पोलिस दुसऱ्यांदा त्यांच्या घरी पोहोचले आहेत. दरम्यान ते फरार असल्याचं बोललं जात आहे.

टॅग्स :crimetempleDemolition