Udaipur Murder | उदयपूर हत्येनंतर भाजप अॅक्टिव्ह, 'हिंदू किलींग'वरून वातावरण तापवणार

राजस्थानमधील उदयपूरमध्ये दोन लोकांनी कन्हैयालाल या युवकाची गळा चिरुन हत्या
Amit Shah
Amit Shahsakal

नवी दिल्ली : राजस्थानमधील उदयपूरमध्ये दोन लोकांनी कन्हैयालाल या युवकाची गळा चिरुन हत्या केल्याच्या भयावह घटनेच्या मागील ‘आंतरराष्ट्रीय ॲंगल' ची शक्यता लक्षात घेऊन केंद्रीय गृहमंत्रालयाने कन्हैया लालच्या हत्येचा तपास केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) मार्फत करण्याचा निर्णय आज घेतला. दुसरीकडे भाजपने हे प्रकरण तापविले असून, दिवसाढवळ्या अशी नृशंस हत्या होणे हे राजस्थानातील अशोक गेहलोत सरकारचे साफ अपयश असल्याच्या मुद्यावरून राजस्थानात आंदोलने तीव्र करण्याची रणनीती आखली आहे. कन्हैय्यालाल यांना १७ जूनला धमकी मिळाल्यावर राजस्थान पोलिसांनी तत्काळ त्याची दखल न घेता ते तब्बल ११ दिवस शांत बसून का राहिले ? हा भाजपच्या आरोपातील ठळक मुद्दा आहे.

या प्रकरणातील आरोपींनी हत्येनंतर सोशल मीडियावर पोस्ट टाकून जबाबदारी स्वीकारताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही उल्लेख केल्याने केंद्रीय यंत्रणा विलक्षण सावध झाल्या आहेत. याच्याशी इस्लामिक संघटनेचा संबंध आहे का? विशेषत: यात पाकिस्तान कनेक्शन आहे का? याचाही तपास केंद्रीय पथक तपास करणार आहे. एनआयए च्या मार्फत या हत्येचा तपास करण्याचे जाहीर झाल्यावर लगेचच या संस्थेचे ४ सदस्यांचे विशेष पथक तपासासाठी राजस्थानला रवाना झाले आहे. दोन्ही खुनी युवकांनाही एनआयए पथक ताब्यात घेऊन दिल्लीला आणण्याची शक्यता आहे.

जिंदाल यांना धमकी

प्रेषित पैगंबरांच्या बदनामी प्रकरणातील बडतर्फ भाजप नेते नवीन जिंदाल यांनाही ‘उदयपूरच्या कन्हैय्यालाल प्रमाणेच तुझाही गळा चिरून टाकू‘, अशा धमकीचा ई मेल आज आल्याने खळबळ उडाली आहे.जिंदाल यांना यापूर्वीच धमक्या मिळाल्या असून त्यांनी सुरक्षेसाठी आपल्या कुटुंबीयांना दिल्लीबाहेर पाठविले आहे. त्यांना आज सकाळी आलेल्या मेलमध्ये म्हटले आहे की ‘अतिरेकी नवीन कुमार, आता तुझी वेळ आली आहे. आम्ही लवकरच तुझाही गळा चिरून टाकू.

भाजप नेते संतप्त

भाजप नेत्यांनी या प्रकरणावरून गेहलोत सरकारवर चौफेर हल्ला चढविला आहे. राजस्थानात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका आहेत. एका निष्पाप तरूणाची ही भीतीदायक हत्या हा राजस्थान सरकारच्या लांगूलचालनाच्या धोरणाचा परिणाम असल्याची टीका माजी माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनीही राज्य सराकरवर व कायदा सुव्यवस्थेवर टीकेची झोड उठविली आहे.

दरम्यान कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांनी घटनेचा निषेध करताना केलेल्या ट्विटमध्ये धर्म शब्द वापरल्यावरून केंद्रीय मंत्री गिरीराजसिंह यांनी टीका केली आहे. ‘धर्म' नव्हे ‘मजहब' म्हणा, तोच शब्द तुमच्या विचारांशी जुळतो असा उपरोधिक सल्ला गांधी यांना दिला आहे.

‘माझ्या शांत राजस्थानात ही अफगाणिस्तानी मानसिकता दिसणे क्लेशदायक आहे,‘ असे केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी म्हटले. ही क्रूर मानसिकता व त्यानुसार केलेली हत्या साऱया देसासाठी चिंतेचा विषय आहे असे सांगताना शेखावत म्हणाले की या अतिरेकी तरूणांनी देशाच्या पंतप्राधानंनाही धमकी दिली. पंतप्रधान मोदी यांच्या मागे देशातील कोट्यवधी नागरिकांचे आशीर्वाद आहेत. पण ही घातक प्रवृत्ती एकाद्या आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे का, राजस्थानात अशा दहशतवादी वृत्तींना पोषक वातावरण तयार झाले आहे का, याचाही तपास व्हायला हवा असेही शेखावत यांनी म्हटले.

माजी केंद्रीय मंत्री राजवर्धनसिंह राठोड यांनी, राजस्थान सराकरच कन्हैय्यालाल यांच्या हत्येला दोषी असल्याचा आरोप केला आहे. यात भाजपवर आरोप करणे सोपे आहे पण इतक्या भीषण पध्दीतने हत्या होणे हे राज्य सरकारचे अपयश असल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे सांगताना राठोड म्हणाले की यात राजस्थानची बदनामी झाल्याचे दुःख आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com