रजनीकांत म्हणतात, 'हा माझ्या विरोधात भाजपचा डाव'; तमीळनाडूत वाद उफाळला

टीम ई-सकाळ
Friday, 8 November 2019

रजनीकांत म्हणाले, 'मीडियातील काही लोक मला भगव्या विचारांचा असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, तसे नाही. जर, त्यांच्या पक्षात कोण सामील होत असतील तर, मला काही हरकत नाही. माझा निर्णय मी घेईन.'

चेन्नई : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा गुंता वाढलेला असताना दक्षिणेत तमीळनाडूमध्ये एक वेगळाच वाद उफाळून आलाय. तमीळ कवी थिरूवल्लूवर हिंदू कवी होते, असे भाजपने म्हटल्यामुळं तमीळनाडूमध्ये राजकीय वाद उफळून आला आहे. त्यात आता ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांनी उडी घेतली आहे. 

अडीच वर्षांचा प्रस्ताव असेल, तरच चर्चा; शिवसेना आक्रमकच

काय म्हणाले रजनीकांत? 
या संदर्भात आज, माध्यमांशी बोलताना रजनीकांत म्हणाले, 'ज्या पद्धतीने थिरूवल्लूवर यांना भगवी शाल पांघरण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याच प्रमाणे मलाही भगवा रंग फासण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण, थिरुवल्लूवर आणि मी या जाळ्यात अडकणार नाही.' थिरुवल्लूवर यांना भगवी शाल पांघरणे हा भाजपचा अजेंडा आहे. देशात, राज्यात अनेक महत्त्वाचे विषय आहेत. त्या विषयांना बगल देण्यासाठी असे विषय उकरून काढले जात आहेत. या विषयांना फारसं महत्त्वही द्यायला नको, सगळा मुखर्पणा आहे, असं रजनीकांत यांनी स्पष्ट केलंय. अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर शांतता राखण्याचे आवाहनही रजनीकांत यांनी यावेळी केले. रजनीकांत म्हणाले, 'मीडियातील काही लोक मला भगव्या विचारांचा असल्याचे दाखवण्याचा डाव करत आहेत. पण, तसे नाही. जर, त्यांच्या पक्षात कोण सामील होत असतील तर, मला काही हरकत नाही. माझा निर्णय मी घेईन.'

शिवरायांचा एकेरी उल्लेख; सोनी टीव्हीची माफी

पुतळ्याला घातली भगवी शाल
तमीळ कवी थिरूवल्लूवर यांच्या पुतळ्याला हिंदू मक्कल कटची संघटनेच्या एका नेत्याने भगवी शाल घातल्याने वाद आणखी चिघळला आहे. अर्जुन संपत या कार्यकर्त्याने थिरूवल्लूवर यांच्या पुतळ्याला भगवी शाल पांघरली. त्यानंतर लगेचच तंजावर पोलिसांनी त्याला अटक केली. भाजप आणि हिंदुत्ववादी संघटना थिरूवल्लूवर यांना हिंदुत्वाशी जोडत असल्याचा आरोप होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rajinikanth statement about bjp and thiruvallur