सुपरस्टार रजनीकांतची राजकारणात एंट्री !

वृत्तसंस्था
रविवार, 31 डिसेंबर 2017

राजकारणात मला प्रवेश करावाच लागेल. आगामी विधानसभेसाठी मी स्वतःचा पक्ष स्थापन करून निवडणूक लढविणार आहे. सगळ्या जागांवर उमेदवार उभे करणार आहे.

चेन्नई : सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश केल्याची स्पष्ट घोषणा आज (रविवार) चेन्नईत केली. तमिळनाडूची आगामी विधानसभा निवडणूक स्वतंत्र पक्ष स्थापून लढविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. विधानसभेच्या सर्व जागांवर आपला पक्ष उमेदवार उभे करेल, असेही त्यांनी सांगितले. 

'सत्य, कार्य आणि वाढ हे आपल्या पक्षाचे तीन मंत्र असतील,' असे रजनीकांत यांनी स्पष्ट केले. 

रजनीकांत यांनी सकाळी नऊ वाजता चेन्नईतील श्री राघवेंद्र कल्याण मंडप येथे ही घोषणा केली. रजनीकांत आज राजकीय घोषणा करतील, असा अंदाज बांधला जात होता. तो खरा ठरला. घोषणा करताना रजनीकांत यांनी तमिळनाडूतील सध्याच्या राजकारणावर कडाडून टीका केली. 

'राजकारणात मला प्रवेश करावाच लागेल. आगामी विधानसभेसाठी मी स्वतःचा पक्ष स्थापन करून निवडणूक लढविणार आहे. सगळ्या जागांवर उमेदवार उभे करणार आहे,' असे रजनीकांत यांनी जाहीर केले. 

ते म्हणाले, 'तमिळनाडूत लोकशाहीची अत्यंत वाईट अवस्था झालेली आहे. इतर राज्यांच्यादृष्टीने तमिळनाडू हास्यास्पद बनले आहे. अशा परिस्थितीत मी कोणताही निर्णय घेतला नाही, तर त्याचा स्वतःलाच खेद वाटेल. राजकारणी आपले पैसे लुटत आहेत. आपल्या जमिनी लुटत आहेत. आपल्याला हे बदलायचे असेल, तर मुळापासून बदल करावे लागतील.'

तमिळनाडूमध्ये 2016 मध्ये विधानसभा निवडणूक झाली आहे. जयललिता यांच्या अण्णा द्रमुक पक्षाचे सरकार तेथे सत्तेवर आहे. जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुकमध्ये एकसंघता राहिलेली नाही. जयललिता यांचे निधन आणि करुणानिधी यांचा वृद्धापकाळ यामुळे तमिळनाडूच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी रजनीकांत भरून काढतील, असे मानले जात आहे. परवाच्या मंगळवारी रजनीकांत यांनी राजकीय घोषणा रविवारी करण्याचे संकेत दिले होते. दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत रजनीकात गेली चाळीस वर्षे अक्षरशः राज्य करीत आहेत. दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टी आणि राजकारण यांचे जवळचे नाते आहे.

Web Title: Rajinikanthpoliticalentry Chennai Truth work and growth will be the three mantras of our party says Rajinikanth