राजकोटमधील बॅंकेत 871 कोटींच्या संशस्यास्पद ठेवी

पीटीआय
सोमवार, 9 जानेवारी 2017

या बॅंकेच्या अनेक खात्यांमध्ये अनियमितता आढळून आली आहे. प्राप्तिकर विभागाला या खात्यांमध्ये एक हजार व पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा आढळून आल्या. ही सर्व रक्कम 9 नोव्हेंबर ते 30 डिसेंबरदरम्यान भरलेली असून, यापैकी 108 कोटी रुपये काढल्याचेही निदर्शनास आले आहे

नवी दिल्ली - प्राप्तिकर विभागाने राजकोटस्थित सहकारी बॅंकेमध्ये 871 कोटी रुपयांच्या संशयास्पद ठेवी ठेवल्याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे. या बॅंकेतील सर्व ठेवी साडेचार हजार नवीन खाती खोलून त्यामध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या खात्यांपैकी साठ ते सत्तर खात्यांवर नमूद केलेले मोबाईल नंबर एकसारखेच असल्याने प्राप्तिकर विभागाला संशय आला. नोटाबंदीच्या निर्णयानंतर ही प्राप्तिकर विभागाची सर्वांत मोठी कारवाई आहे.

या प्राप्तिकर विभागाने कर कायद्यांतर्गत या बॅंकेची चौकशी सुरू केली आहे. या बॅंकेच्या अनेक खात्यांमध्ये अनियमितता आढळून आली आहे. प्राप्तिकर विभागाला या खात्यांमध्ये एक हजार व पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा आढळून आल्या. ही सर्व रक्कम 9 नोव्हेंबर ते 30 डिसेंबरदरम्यान भरलेली असून, यापैकी 108 कोटी रुपये काढल्याचेही निदर्शनास आले आहे. नोटाबंदीनंतर बॅंकेच्या हालचाली संशयास्पद असल्याचे निरीक्षणही प्राप्तिकर विभागाने नोंदविले. विशेषत: संशयास्पद ठेवी असणारी खाती सुरू करण्यासाठी पॅन नंबरही दिलेला नाही; तसेच अनेक कागदपत्रांवर खातेदारांच्या सह्याही नाहीत.

नोटा जमा करून घेण्यासाठी दीड कोटी घेतले
बॅंकेच्या माजी संचालकांच्या मुलाला 30 बॅंक खात्यांमध्ये ठेवी ठेवण्यासाठी 1 कोटी रुपये मिळाल्याचे आढळले आहे. पैसे भरताना भरावयाच्या स्लीप एकाच व्यक्‍तीकडून भरण्यात आल्या आहेत. याचसोबत बॅंकेच्या उपाध्यक्षांच्या पत्नीला ही रक्कम ठेवण्यासाठी 64 लाख रुपये मिळाल्याचेही समोर आले आहे. ही रक्कम नंतर सराफा व्यावसायिकांकडे ठेवण्यात आली होती, असे प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे. हा पैसा आरटीजीएस आणि इतर बॅंक खात्यांमध्ये वळविण्याचे प्रयत्न सुरू होते, असे प्राप्तिकर विभागाने आपल्या अहवालात नमूद केले आहे.

Web Title: Rajkot bank witness suspicious investment of crores