जवानांच्या कुटुंबियांना अक्षयची मदत; राजनाथसिंहांकडून कौतुक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 मार्च 2017

"सुकमा जिल्ह्यात हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी केलेल्या मदतीबद्दल मी अक्षय कुमारचे आभार मानतो. अक्षय कुमार यांनी दाखविलेले औदार्य कौतुकास्पद आहे. त्यांच्या कृतीमुळे इतरांना प्रेरणा मिळेल आणि ते हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांच्या मदत करतील.'
- राजनाथसिंह

नवी दिल्ली : छत्तीसगढमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत हुतात्मा झालेल्या अकरा जवानांच्या कुुटुंबियांना अभिनेता अक्षय कुमारने 1.08 कोटी रुपयांची मदत केली आहे. त्याने केलेल्या मदतीबद्दल केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी अक्षयचे कौतुक केले आहे.

अकरा मार्च रोजी छत्तसीगढमधील सुकमा जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांची नक्षलवाद्यांशी चकमक झाली. या चकमकीत अकरा जवान हुतात्मा झाले. या घटनेनंतर तातडीने अक्षय कुमारने आर्थिक मदत करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांच्या बँक खात्याची माहिती देण्याची विनंती केली होती. यानंतर गृह मंत्रालयाने त्याच्या विनंतीची दखल घेत सीआरपीएफला कुटुंबियांच्या बँक खात्याची माहिती देण्याचे निर्देश दिले होते. अक्षयने प्रत्येक कुटुंबियांच्या खात्यात नऊ लाख रुपये जमा केले आहेत.

त्याच्या या कृतीबद्दल राजनाथसिंह यांनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यांनी लिहिले आहे की, "सुकमा जिल्ह्यात हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी केलेल्या मदतीबद्दल मी अक्षय कुमारचे आभार मानतो. अक्षय कुमार यांनी दाखविलेले औदार्य कौतुकास्पद आहे. त्यांच्या कृतीमुळे इतरांना प्रेरणा मिळेल आणि ते हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांच्या मदत करतील.'

Web Title: Rajnathsingh comment about Akshay Kumar's help for families of Sukma martyrs