'भंसाली केहनो मान ले, बोरियो बिस्तर बाँध ले'

टीम ई सकाळ
गुरुवार, 16 मार्च 2017

मुंबई आणि कोल्हापूरमधील हजारो करणी सेनेच्या आणि हिंदू कार्यकर्त्यांनी बुधवारी पहाटे अडीच वाजता पद्मावती चित्रपटाच्या सेटवर जाऊन तोडफोड केली व सेट पेटवून दिला. काही कलाकारांनाही मारहाण करण्यात आली. या कृत्यामुळे चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे.

राजपूत करणी सेनेच्या आदेशावरुनच करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी संजय लिला भन्साळी यांच्या 'पद्मावती' चित्रपटाचा कोल्हापूरजवळील सेट पेटवून दिल्याचा दावा फेसबुकवरील राजपूत करणी खात्यावरुन करण्यात आला आहे. 

इतिहासाची मोडतोड करुन राणी पद्मावतीची व्यक्तिरेखा चुकीच्या पद्धतीने रंगवत असल्याचा आरोप करणी सेनेने केला आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्याबद्दल भन्साळी यांना आम्ही या आगोदरच सांगितले होते. त्यानंतरही शूटिंग सुरु ठेवल्याने कोल्हापुरात बुधवारी पहाटे करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी सेटला आग लावल्याचे या पोस्टमध्ये लिहिण्यात आले आहे. 

करणी सेनेच्या फेसबुक पेजवरून करण्यात आलेल्या दाव्यात म्हटले आहे, की मुंबई आणि कोल्हापूरमधील हजारो करणी सेनेच्या आणि हिंदू कार्यकर्त्यांनी बुधवारी पहाटे अडीच वाजता पद्मावती चित्रपटाच्या सेटवर जाऊन तोडफोड केली व सेट पेटवून दिला. काही कलाकारांनाही मारहाण करण्यात आली. या कृत्यामुळे चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. करणी सेना जिंदाबाद. महिपाल सिंह मकराना, रघुराज सिंह सबलपुरा, विजेन्द्र सिंह कल्याणवत यांनी पूर्ण नियोजनबद्ध हे मिशन पूर्ण केले.

राजस्थानमधील राजपूत करणी सेनेने राजस्थानमध्येही 'पद्मावती' च्या चित्रीकरणाला विरोध केला होता. राजपूत करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी सेटवर धुडगूस घातल्यानंतर या चित्रपटाचे चित्रिकरण राजस्थानमध्ये थांबविण्यात आले होते. त्यानंतर भन्साळी यांनीही राजस्थानमध्ये चित्रिकरण करणार नसल्याचे जाहीर केले होते.

त्यानंतर कोल्हापूरजवळील पन्हाळगडाशेजारील मसाई पठारावर चित्रपटाचे चार मार्चपासून शुटिंग सुरू होते. बुधवारी पहाटे चित्रपटाचा महाकाय सेट पेटवून देण्यात आला. सुमारे तीस ते चाळीस जणांचा जमाव पेट्रोल बॉम्ब घेऊन पठारावर आला आणि जमावाने पेटवापेटवी सुरू केली. मारहाणीत एक चित्रपट कर्मचारी जखमी झाला होता. याप्रकरणी कोणालाही अटक झालेली नव्हती.

Web Title: Rajput Karni Sena claims vandalizing Padmavati set in Kolhapur