esakal | पायलट यांच्यावर कारवाईनंतर गेहलोत यांचे भाजपवर गंभीर आरोप

बोलून बातमी शोधा

ashok gehlot

गेल्या काही दिवसांपासून राजस्थानातील राजकीय वातावरण तापलं होतं. काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली आहे.

पायलट यांच्यावर कारवाईनंतर गेहलोत यांचे भाजपवर गंभीर आरोप
sakal_logo
By
सूरज यादव

जयपूर - गेल्या काही दिवसांपासून राजस्थानातील राजकीय वातावरण तापलं होतं. काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली आहे. राजस्थानच्या प्रदेशाध्यक्ष पदासह उप मुख्यमंत्रीपदावरूनही त्यांना हटवण्यात आलं आहे. यानंतर बोलताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले की, सचिन पायलट यांच्या हातात काही नाही. यामागे भाजपची खेळी आहे. भाजपनेच रिसॉर्ट आणि इतर गोष्टी मॅनेज केल्या आहेत. मध्य प्रदेशात राजकीय भूकंप घडवणाऱी टीम इथं काम करत असल्याचंही गेहलोत म्हणाले. 

पायलट यांच्या हकालपट्टीबद्दल बोलताना गेहलोत म्हणाले की, आम्ही त्यांची तक्रार केली नव्हती. त्यांच्याच गेल्या काही काळातील वागणुकीमुळे ही वेळ ओढावली आहे. पक्षाला घ्यायला लागलेल्या या निर्णयाने कोणीही आनंदी नाही. पायलट यांना जे हवं ते दिलं होतं असंही गेहलोत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

राजस्थानात सत्तेचा घोडाबाजार बऱ्याच काळापासून भाजप करत होते. त्यासाठी हॉटेल वगैरेची व्यवस्था त्यांच्याकडून होत होती. त्यामुळेच पक्षश्रेष्ठींनी हा निर्णय घेतला असल्याचं गेहलोत म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यपाल कालराज मिश्रा यांच्याकडे सचिन पायलट यांना उप मुख्यमंत्री पदावरून हटवण्याचा प्रस्ताव सादर केला होता. याशिवाय विश्वेंदर सिंग आणि रमेश मीना यांच्याही हकालपट्टीचा प्रस्ताव दिला होता. राज्यपालांनी याला मंजुरी दिली आहे.

हे वाचा - सचिन पायलट यांच्या बंडखोरीला आहे 'वारसा'; वडिलांनीही उचलला होता बंडाचा झेंडा

काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं की, भाजपने एक षडयंत्र रचलं असून त्यांनी राजस्थानच्या जनतेच्या सन्मानाला आव्हान दिलं आहे. भाजपच्या कटातनुसार काँग्रेसचं सरकार अस्थिर करायचं आणि पाडायचा प्रयत्न सुरू आहे. धनाच्या आणि सत्तेच्या जोरावर काँग्रेससह अपक्ष आमदारांना खरेदी करण्याचा भाजपचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोपही सुरजेवाला यांनी केला. 

हे वाचा - सचिन पायलट यांनाच दणका; दोन मंत्र्यांसह पदावरुन हकालपट्टी

सचिन पायलट भाजपच्या जाळ्यात फसले आहेत आणि काँग्रेस सरकार पाडण्यासाठी हालचाल करत आहेत. गेल्या 72 तासांपासून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सचिन पायलट यांच्यासह इतर नेत्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसकडून सचिन पायलट यांची मनधरणी करण्याचेही प्रयत्न झाले मात्र त्यांच्याकडून सकारात्मक असा प्रतिसाद मिळाला नाही असंही रणदीप सुरजेवाला म्हणाले.