esakal | 3 हजार 24 कोटींसाठी सचिन पायलट यांची बंडखोरी?
sakal

बोलून बातमी शोधा

sachin pilot rajsthan

राजस्थानात सचिन पायलट यांच्या बंडखोरीनंतर राज्यात राजकीय नाट्य घडत आहे. सचिन पायलट यांची पक्षाने हकालपट्टी केल्यानंतर आता नवीन माहिती समोर येत आहे. 

3 हजार 24 कोटींसाठी सचिन पायलट यांची बंडखोरी?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जयपूर - राजस्थानात सचिन पायलट यांच्या बंडखोरीनंतर राज्यात राजकीय नाट्य घडत आहे. सचिन पायलट यांची पक्षाने हकालपट्टी केल्यानंतर आता नवीन माहिती समोर येत आहे. राजस्थानच्या अर्थ खात्याकडून 2019-20 या वर्षात ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभागाला 3 हजार 24 कोटींचा निधी अद्याप देण्यात आलेला नाही. ही दोन्ही खाती माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्याकडे होती. निधी रोखल्यानं पायलट नाराज होते का अशी चर्चा आता होत आहे.

ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभागाने याबाबत सादरीकरण दिल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. राज्याचे मुख्य सचिव राजीवा स्वरुप यांच्या अध्यक्षतेखालील राज्य स्तरीय विकास आणि समन्वय समितीच्या बैठकीत अनेक विभागांचा आढावा घेण्यात आला. 30 जुलैला झालेल्या या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. 

हे वाचा - मोदी अयोध्येत सर्वात आधी करणार हनुमानाची पूजा; जाणून घ्या कारण

विभागांतर्गत प्रश्नांवर चर्चेवेळी सादरीकरणात सचिवांनी अशी माहिती दिली की, ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभागासाठीचा निधी राज्य आर्थिक मंडळाकडून दिला जातो. आर्थिक विभाग हा मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडे आहे. 1883.25 कोटी रुपयांचा केंद्र सरकारचा निधी प्रलंबित होता. कारण राज्य सरकारने 1262.53 कोटींचा निधी मनरेगा, प्रधान मंत्री ग्रामीण आवास योजना, एनआरएलएम सह विविध योजनांचा निधी दिली नव्हता. 

केंद्र सरकारकडून ग्रामपंचायतींसाठी आलेल्या पैशांच्या व्यवहारात दिरंगाई झाल्यानं त्यावरील थकीत व्याजाचा मुद्दाही होता. याशिवाय इतरही अनेक समस्या पंचायती राज विभागाच्या होत्या. 2014 मध्ये कऱण्यात आलेल्या पंचायत राज समितीच्या इमारतींच्या बांधकामांसाठी 11 कोटींची गरज होती. तसंच एप्रिल 2020 पासून पंचायत सहाय्यकांचे वेतनही दिलं गेलं नाही. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेची 45 कोटींहून अधिक बिलांना मंजुरी मिळालेली नाही. तसंच 90 कोटी रुपयांची बिलं अद्याप पाठवलेली नाहीत. 

हे वाचा - अयोध्यानगरीवर ड्रोनची करडी नजर; कडेकोट सुरक्षा

काँग्रेसमधील तरुण चेहरा म्हणून, ज्यांच्याकडं विश्वासानं पाहिलं जात होतं. त्या सचिन पायलट यांच्या बंडखोरीनं सगळ्यांनाच धक्का बसला होता. पायलट यांच्या बंडखोरीमुळं गेहलोत सरकार अडचणीत येण्याचा धोका होता. परंतु, काँग्रेसने पायलट यांच्यासह त्यांच्या गटातील आमदारांना निलंबित केल्यामुळं, पायलट यांचं बंड पेल्यातील वादळ ठरलं. काँग्रेसनं त्यांची उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली. त्यावेळी पायलट यांनी आपण, भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचं जाहीर केलं होतं. आता त्यांच्या घरवापसीचीसुद्धा चर्चा सुरू झाली आहे.