esakal | सचिन पायलट म्हणाले,'डॉक्टरांना दुखणं सांगितलं आणि उपचारही केले' बंडखोरीवरून डिवचणाऱ्यांना प्रत्युत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

sachin pilot

बंडखोरी केलेल्या सचिन पायलट यांना विधानसभेच्या सभागृहात बसण्यासाठीची जागा मागे होती. त्यावर पायलट म्हणाले की, मी जोपर्यंत इथं आहे तोपर्यंत सरकार सुरक्षित आहे. 

सचिन पायलट म्हणाले,'डॉक्टरांना दुखणं सांगितलं आणि उपचारही केले' बंडखोरीवरून डिवचणाऱ्यांना प्रत्युत्तर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जयपूर - राजस्थान विधानसभेच्या विशेष अधिवेशनात गेहलोत सरकारने सादर केलेला विश्वासमत ठराव जिंकला आहे. आवाजी मतदानाने सदनात प्रस्ताव मंजूर झाला. यानंतर सदनाचे कामकाज 21 ऑगस्टपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. मतदानाच्या आधी झालेल्या चर्चेवेळी काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांनीही त्यांचे म्हणणे मांडले. त्यानंतर विरोधी पक्षाचे नेते सतीश पुनिया यांनी गेहलोत सरकारवर हल्लाबोल केला. पुनिया म्हणाले की, जगातील हे पहिलं सरकार असेल जे लोकशाहीवर बोलत होतं पण सरकार मात्र जुगाड करून चालवलं जात होतं. राजस्थानात जुगाड प्रसिद्ध आहे आणि जुगाडासाठी जादूगर असं म्हणत पुनिया यांनी गेहलोत यांच्यावर निशाणा साधताना म्हटलं की, तुम्ही तर अख्खे हात्ती खाल्लेत. यावेळी त्यांचा रोख बसपच्या आमदारांकडे होता. 

सचिन पायलट यांच्या बंडखोरीवरूनही राठोड यांनी हल्लाबोल केला. यावरही पायलट यांनी प्रत्युत्तर दिलं. पायलट म्हणाले की, डॉक्टरांना दुखणं सांगायचं होतं. ते सांगितलं आणि उपचार करून आज आम्ही सगळे एकत्र आहे. ऐकलं - सांगितलं या गोष्टी सोडून आता जमिनीवर या. बॉर्डरवरून कितीही गोळीबार झाला तरी आम्ही योद्धे आहोत सर्वकाही सुरक्षित ठेवू असंही पायलट म्हणाले. 

हे वाचा - मुख्यमंत्री गेहलोत यांच्या धावपट्टीवर सचिन पायलट

राजस्थान सरकारच्यावतीने संसदीय कामकाज मंत्री शांती धारीवाल यांनी प्रस्ताव सादर केला. आता पुढचे तीन तास यावर चर्चा होणार. याआधी शांती धारीवाल यांनी म्हटलं की, विश्वासमताचा प्रस्ताव सादर करण्याची पूर्ण तयारी केली आहे. रघु शर्मा म्हणाले होते की, बहुमताबाबत काँग्रेसला पूर्ण विश्वास आहे. दुसरीकडे भाजप नेता गुलाबचंद कटारिया यांनी स्पष्ट केलं होतं की, त्यांचा पक्ष अविश्वास प्रस्ताव आणणार नाही. दरम्यान, विधानसभेच्या कार्यवाहीसाठी आल्यानंतर दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कामकाज दुपारी एक वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं होतं. 

बंडखोरी केलेल्या सचिन पायलट यांना विधानसभेच्या सभागृहात बसण्यासाठीची जागा मागे होती. त्यावर बोलताना सचिन पायलट म्हणाले की, आज मी सदनात आलो तेव्हा माझी सीट मागे असल्याचं दिसलं. मी शेवटच्या रांगेत बसलो आहे. मी राजस्थानचा आहे आणि आम्ही पाकिस्तान बॉर्डरवर आहे. सीमेवर सक्षम असे शिपाई तैनात असतात. मी जोपर्यंत इथं आहे तोपर्यंत सरकार सुरक्षित आहे. 

हे वाचा - काँग्रेसचा भाजपवर उलटा डाव; अशोक गेहलोत यांनी घेतला मोठा निर्णय

याआधी बहुजन समाज पार्टीने त्यांच्या सहा आमदारांना व्हिप जारी केला आहे. मात्र हे सहा आमदार आधीच पक्ष बदलून काँग्रेसच्या गोटात सामिल झाले आहेत. याविरोधात बसपाने न्यायालयात आव्हान दिलं आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते सुधींद्र भदौरिया यांनी म्हटलं की, पक्षांतर विरोधी कायद्यानुसार कोणत्याही राज्यातील पक्ष विलिन कऱण्याचा अधिकार नाही.