esakal | हद्दच झाली! इमारत बांधली पण दरवाजा विसरले; आत जायचं कसं?
sakal

बोलून बातमी शोधा

building

जिल्हा रुग्णालयात ऑपरेशन थिएटरसह 25 बेडच्या क्षमतेचा सर्जिकल वॉर्ड बांधण्यात आला. यासाठी एक कोटी रुपयांचा खर्चही केला आहे.

हद्दच झाली! इमारत बांधली पण दरवाजा विसरले; आत जायचं कसं?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जयपूर -सोशल मीडियावर नेहमी काही ना काही व्हायरल होत असतं. कधी खिल्ली उडवण्यासाठी, मजा घेण्यासाठी आपण शेअर करतो. त्यामध्ये बऱ्याचदा इंजिनअर दरवाजा बांधायला विसरले. चुकीच्या ठिकाणी जिना लावला वगैरेसाऱखे फोटोज असतात. आता भारतात अशी एक घटना समोर आली असून त्याची चर्चा होत आहे. राजस्थानमधील बांसवाडा जिल्ह्यातील सर्वात मोठं रुग्णालय असलेल्या महात्मा गांधी रुग्णालयात ऑपरेशन थिएटरसह 25 बेडच्या क्षमतेचा सर्जिकल वॉर्ड बांधण्यात आला. यासाठी एक कोटी रुपयांचा खर्चही केला आहे. मात्र आता मोठी चूक समोर आली असून खिल्ली उडवली जात आहे. 

राजस्थान राज्यसरकारने गेल्या वर्षी बांसवाडा इथं महाता्मा गांधी रुग्णालयाच्या एका मजल्यावर 25 बेडचा सर्जिकल वॉर्ड बांधण्याची परवानगी दिली होती. त्यासोबत ऑपरेशन थिएटरही बांधण्यात येणार होतं. या बांधकामाचे काम राष्ट्रीय आरोग्य मिशनकडे सोपवले होते. डिझाइन करण्यात आलेल्या वॉर्डला इंजिनअर दरवाजा बांधायचेच विसरल्याची घटना समोर आली आहे.

बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराला ही चूक लक्षात न येण्याचं कारणही मजेशीर सांगितलं जात आहे. क्रेनच्या मदतीनं सर्व साहित्य पोहोचवल्याने दरवाजाच नसल्याचं लक्षात आलं नाही असं म्हटलं जात आहे. वॉर्डच्या बांधकामासाठी कोणतंच डिझाइन तयार करण्यात आलं नव्हतं अशी धक्कादायक माहितीसुद्धा आता समोर येत आहे. 

हे वाचा - बाबा का ढाबा प्रकरण; यूट्यूबर गौरव वासवानविरोधात खटला दाखल

दरवाजाच नसलेल्या वॉर्डला एक आपत्कालीन बाहेर पडण्याचा मार्ग आहे. मात्र तो मार्ग रुग्णालयाच्या मागच्या बाजूला आहे. तो वाढवल्यास तिथून खाली उतरण्यासाठी वेगळा जिना आणि पुन्हा मार्ग तयार करावा लागेल. मात्र यामुळे इमारतीत असूनही ऑपरेशन थिएटरला जाण्यासाठी बाहेरून जावे लागेल आणि वेळेचाही अपव्यय होणार आहे. त्यामुळे दरवाजाचे करायचे काय असा प्रश्न सर्व अधिकाऱ्यांना पडला आहे. 

याप्रकरणी महात्मा गांधी रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल भाटी यांनी सांगितलं की, बांधकामावेळी राहिलेल्या त्रुटीकडे लक्ष गेलं नाही. आपत्कालीन मार्गातून ये जा करणं शक्य नाही. या वॉर्डपर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग शोधला जात आहे. मात्र सध्या अशी कोणतीच जागा समोर येत नाही. आता मागच्या बाजुला असलेल्या दरवाजाच्या ठिकाणी काही करता येईल का यावर विचार सुरु असल्याचं त्यांनी सांगितले.