
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पंतप्रधान मोदींसह केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून राजु शेट्टींनी केंद्राला इशाराच दिला.
'सीरम'मधून बाहेर पडणाऱ्या गाड्या आडवू; राजू शेट्टींचा मोदी सरकारला इशारा!
नवी दिल्ली - देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून नवीन रुग्ण मोठ्या संख्येनं सापडत आहेत. शुक्रवारी दिवसभरात तब्बल 1 लाख 45 हजार नवे रुग्ण सापडले. दरम्यान, देशातील लसीकरण मोहिम लशींच्या अपुऱ्या साठ्यामुळे मंदावली आहे. अनेक राज्यात कोरोना लशीचा तुटवडा असल्यानं लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक सर्वाधिक असून इथंही लशीचा तुटवडा भासत आहे. राज्यात अनेक लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली आहे. यावरून आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पंतप्रधान मोदींसह केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून राजु शेट्टींनी केंद्राला इशाराच दिला. जर महाराष्ट्राला पुरेसा लस पुरवठा केला नाहीत तर सीरममधूनम एकही लशीचा ट्रक बाहेर जाऊ देणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
राजु शेट्टी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांना एक पत्र लिहिलं आहे. आठवड्याच्या आत महाराष्ट्राला आवश्यक असलेल्या लस पुरवठ्यात वाढ केली नाही तर इतर राज्यांमध्ये लस घेऊन जाणारी वाहने सीरममधून बाहेर जाऊ देणार नाही.
हे वाचा - कोरोनाचा तडाखा; 24 तासांत तब्बल 1.45 लाखांहून अधिक रुग्ण, 794 जणांचा मृत्यू
महाराष्ट्रात लशीचा तुटवडा असल्यानं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही केंद्राकडून पुरेशा प्रमाणात लस दिली जात नसल्याचा दावा केला होता. लस मिळत नसल्यानं लसीकरण केंद्रावर लोकांच्या रांगा लागल्याचं चित्रही राज्यात दिसत आहे. तसंच लशीचं राजकारणही होत असल्यानं नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसह प्रकाश जावडेकर आणि महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी राज्य सरकार लशी वाया घालवल्याचा आरोप करत टीका केली होती. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सविस्तर आकडेवारी मांडून कशा पद्धतीने लस देण्याच्या बाबतीत राजकारण केलं जात आहे हे सांगितलं होतं.
हे वाचा - मोदी सरकार पाकिस्तानला आणखी लस पाठवणार; काँग्रेस, आपचा केंद्रावर हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस महोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं असातना दुसरीकडे मात्र लसच उपलब्ध नसल्याची परिस्थिती आहे. यावरून काँग्रेस आणि आम आदमी पार्टीनेही केंद्र सरकारवर टीका केली होती. पाकिस्तानला लस देण्यात येणार आहे त्यावर हल्लाबोल करताना केंद्र सरकारने लशीची निर्यात थांबवावी. आधी देशाला वाचवा मग इतर देशांना मदत करा असंही त्यांनी म्हटलं होतं.
Web Title: Raju Shetti Letter Pm Modi And Health Minister Vaccine Serum
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..