Rajyasabha: भारताने इंच देखील जमीन गमावली नाही; राजनाथ सिंहांचा संसेदेत खुलासा

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 11 February 2021

बुधवारी भारत आणि चीनच्या सैनिकांनी सीमा भागातून माघार घेणार असल्याचं जाहीर केलं होतं

नवी दिल्ली- बुधवारी भारत आणि चीनचे सैनिक सीमा भागातून माघार घेत असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज संसदेत काय बोलतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. राजनाथ सिंह म्हणाले की, भारत-चीन देशातील तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशातील संबंध बदलले आहेत. चिनी सैनिकांनी मोठ्या प्रमाणात सीमा भागात शस्त्रसाठा गोळा केला होता. भारताने याला प्रत्युत्तर म्हणून शस्त्रसाठा आणि सैनिक सीमेवर तैनात केले आहे. मला अभिमानाने सांगावं वाटतं की भारतीय सैन्याने याकाळात अतुलनीय शौर्य दाखवले आहे

 

भारतीय सैन्य भारताची अखंडता कायम ठेवण्यासाठी सीमेवर तैनात आहे. घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडण्यात आले आहेत. चीनने 1962 पासून भारतीय सीमेत अतिक्रमण केले. मागील वर्षातही चीननी घुसखोरीचा प्रयत्न केला. आपली जमीन कोणत्याही परिस्थित दुसऱ्याला बळकावली जाऊ देणार नाही. दोन्ही देशांमधील वाद निवळण्यासाठी 9 चर्चेच्या फेऱ्या पार पडल्या आहेत. मला सांगण्यास आनंद होतोय की, पेंगोंग त्सो तलावाच्या भागातून दोन्ही सैनिकांनी माघार घेण्यावर सहमती झाली आहे.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. सप्टेंबरपासून दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरु आहे. द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी सीमेवर शांतता आवश्यक आहे. चीनसोबतच्या चर्चेत भारताने काहीही गमावलं नाही. पेंगोग त्सो भागातून माघार घेतली जात आहे. तसेच इतर भागातूनही माघार घेण्यावर चर्चा सुरु झाली आहे. भारतीय सैन्याने भीषण परिस्थितीत जे शौर्य आणि विरता दाखवली, त्याबद्दल देशवासियांना अभिमान वाटायला हवा. भारतीय सैन्य कधीही आपली जमीन दुसऱ्याला बळकावू देणार नाही, असं राजनाथ सिंह राज्यसभेत बोलताना म्हणाले. 

चिनी मिनिस्ट्री ऑफ डिफेंस नॅशनल डिफेंसचे प्रवक्ता कर्नल वु क्यान यांनी बुधवारी लिखित स्वरुपातील निवेदन सादर करत सांगितलं होतं की, चीन आणि भारताच्या फ्रंट लाईन सैनिकांनी उत्तर आणि दक्षिण पैंगोग त्सो तलावापासून माघार घेण्यास सुरुवात केली आहे. भारत आणि चीनच्या दरम्यान चर्चेची नववी फेरी पार पडली. यावेळी दोन्ही देशांच्या सैनिकांनी माघार घेण्यावर सहमती दर्शवली. ग्लोबल टाईम्य या चिनी सरकारच्या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिलं होतं.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajyasabha india china border issue defense minister rajnath singh