चरखा चालवून इंग्रज देशातून गेले का? भाजप नेत्याचा संजय राऊत यांना प्रश्न

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 September 2020

महाराष्ट्रात हजारो लोक कोरोनामुक्तही झाले आहेत. इतके सारे लोक ‘काय भाभीजी के पापड खाऊन बरे झाले का ?’ अशा शब्दांत शिवसेनेचे संजय राऊत यांनी भाजपला धारेवर धरले.

नवी दिल्ली - पुढील वर्षीच्या सुरवातीला कोरोनावरील लस येण्याची आशा असली तरी १३५ कोटींच्या देशात लस ही जादूची कांडी ठरू शकत नाही. त्यामुळे कोरोनाविरुद्धच्या लढाईत मास्क, सामाजिक अंतरभान, हात स्वच्छ करणे व सॅनिटायजर ही चतुःसूत्री प्रत्येकाने कायम पाळणे अत्यावश्‍यक आहे, असे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राज्यसभेत सांगितले. आरोग्य दिशानिर्देशांचे पालन करण्यात ग्रामीण भारत आघाडीवर आहे, मात्र अनेक शहरांत बेफिकीरी दिसते, असेही निरीक्षण त्यांनी नोंदवले.

दरम्यान, महाराष्ट्रात हजारो लोक कोरोनामुक्तही झाले आहेत. इतके सारे लोक ‘काय भाभीजी के पापड खाऊन बरे झाले का ?’ अशा शब्दांत शिवसेनेचे संजय राऊत यांनी भाजपला धारेवर धरले. राऊत यांना प्रत्युत्तर देताना भाजपचे सुधांशू त्रिवेदी यांनी, चरखा चालवून इंग्रज देशातून गेले का ? असा प्रतिप्रश्‍न केला. अशा मोठ्या लढायांमध्ये चरखा, दिवे, ताली-थाळी ही केवळ प्रतीके असतात हे टीका करणारांनी समजून घ्यावे, असा टोला त्यांनी लगावला.

केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी, बिकानेरचे भाभीजी के पापड खाऊन कोरोना बरा होतो, असे अचाट वक्तव्य केले होते. त्याचा राऊत यांनी आज भाजपविरुद्ध चपखलपणे वापर केला. ही राजकीय नाही तर लोकांचे जीव वाचविण्याची लढाई असल्याचे सांगून राऊत यांनी, आपली ८० वर्षीय आई व छोटा भाऊ कोरोनाग्रस्त झाल्याने अतिदक्षता विभागांत उपचार घेत असल्याचे सांगितले. धारावीतील परिस्थिती नियंत्रणात आणल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनेही मुंबई नगरपालिकेची प्रशंसा केली आहे व येथे काही सदस्यांनी केवळ पक्षीय आकसातून महाराष्ट्र सरकारवर टीका केली.

हे वाचा - मोदी सरकारला झटका; कृषी विधेयकाच्या विरोधात केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा

संक्रमण साखळी तोडणे गरजेचे
संसदेत आल्यावर अनेकांसाठी देशापेक्षा त्यांची पक्षीय भूमिकाच सर्वांत प्राधान्याची का होते या शब्दांत डॉ. हर्षवर्धन यांनी खंत व्यक्त केली. कोरोनाची संक्रमण साखळी तोडणे अती गरजेचे असून मास्क हा माणसाचा सर्वांत मोठा रक्षक असल्याचे सांगून ते म्हणाले, की देशात बरे होण्याचा दर ७८ ते ७९ टक्के वाढला असून मृत्युदर जगात सर्वात कमी १.६ टक्‍के झाल्याचे सांगून, ते म्हणाले की देशातील रुग्णसंख्या ५० लाख दिसत असली तरी सक्रिय रुग्ण १० लाखच (२० टक्के) आहेत. पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली व डब्ल्यूएचओशी समन्वय साधून एक तज्ज्ञ गट तीनही भारतीय लशींचे अध्ययन करत आहे. मात्र पुढील वर्षाच्या प्रारंभी लस आली तरी १३५ कोटी भारतीयांना एका मिनीटांत लसीकरण करणे शक्‍य नाही त्यासाठी प्रत्येकाने शिस्त पाळून, मास्क वापरून कोरोना संक्रमण साखळीच तोडावी लागेल.

१७०० प्रयोगशाळा उभारल्या
लॉकडाउनच्या काळातही देशात १७०० तपासणी प्रयोगशाळा उभ्या राहिल्या. केंद्राने कोणताही भेदभाव न करता राज्यांना सातत्याने मदत केली आहे. पीपीई कीट तयार करणाऱ्या ११० कंपन्या, २५ व्हेंटिलेटर्स उत्पादक कंपन्या व १० मास्क उत्पादक सध्या आहेत. लॉकडाउनमुळे स्थलांतरित मजुरांना त्रास झाल्याची कबुली देऊन ते म्हणाले, की गृह मंत्रालयाने वेळेवर याची दकल घेऊन ६४ लाख मजुरांना विशेष रेल्वेगाड्या चालवून त्यांच्या राज्यांत पोहोचविले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rajyasabha mansoon session bjp mp question over sanjay raut comment