esakal | राजीव गांधींनी काढलं होतं राम मंदिराचं कुलूप
sakal

बोलून बातमी शोधा

ram mandir rajiv gandhi

भाजपचं सरकार असताना राम मंदिराच्या बांधकामास सुरुवात होत आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर मूर्ती ठेवणं, बाबरी मशिदीचं कुलूप काढण्याचं आणि राम मंदिराचा शिलान्यास तसंच बाबरी मशिदीचा विध्वंस या घटना काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात घडल्या आहेत.

राजीव गांधींनी काढलं होतं राम मंदिराचं कुलूप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अयोध्या - अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीचं काम सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सुरु होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी राम मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. राम मंदिराचे स्वप्न आज पूर्ण होत आहे. भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा विश्व हिंदू परिषदेसह हिंदुत्ववादी संघटना यासाठी पुढाकार घेत आहेत. दुसरीकडे काँग्रेसच्या अनेक नेत्यांकडून सध्या कोरोनाच्या संकटकाळात राम मंदिराच्या भूमीपूजनावरून केंद्र सरकारसह भाजपवर टीका करत आहेत. भाजपचं सरकार असताना राम मंदिराच्या बांधकामास सुरुवात होत आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर मूर्ती ठेवणं, बाबरी मशिदीचं कुलूप काढण्याचं आणि राम मंदिराचा शिलान्यास तसंच बाबरी मशिदीचा विध्वंस या घटना काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात घडल्या आहेत. 

प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी अयोध्येत 1528 मध्ये मीर बाकी याने मंदिर पाडून मशिदी बांधल्याचा आरोप आहे. त्यानंतर यामुळे दोन्ही धर्मांमध्ये वाद वाढत गेले. 1885 मध्ये राम मंदिराच्या निर्मितीची मागणी पुढे आली. महंत रघुवर दास यांनी ही मागणी केली होती. देश स्वतंत्र झाल्यानंतर 1950 साली गोपाल सिंह विशारद यांनी रामाच्या पूजेसाठी न्यायालयाकडे विशेष परवानगी मागितली होती. महंत परमहंस रामचंद्र दास यांनी हिंदूंकडून पूजा सुरु राहण्यासाठी खटला दाखल केला. त्यानंतर 1980 च्या दशकात राम मंदिर राजकारणाचा विषय बनलं. 

हे वाचा - श्रीरामाची पूजा करणारे मुस्लिम राष्ट्र

काँग्रेसमध्ये राजीव गांधींचे नेतृत्व उदयास आले होते. त्याचवेळी विश्व हिंदू परिषद राम मंदिराच्या मुद्द्यावरून चर्चेत राहत होती. राजीव गांधी यांना रामायणाचा देशात असलेला प्रभाव माहिती होता. त्यांच्याच सांगण्यावरून देशात 1985 ला दूरदर्शनवरून रामानंद सागर यांच्या रामायणाचे प्रसारण करण्यात आलं होतं. तेव्हा राजीव गांधींनी उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वीर बहाद्दुर सिंह यांचे मन वळवले. त्यानंतरच राम जन्मभूमीचं कुलुप काढलं आणि प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेण्याची संधी लोकांना मिळाली. 

हे वाचा - राम मंदिर दिसणार कसं? ट्रस्टने प्रसिद्ध केले 8 फोटो

1989 ला झालेल्या निवडणुकांवेळी भाषणांमध्ये राजीव गांधींनी अनेकदा रामराज्य आणण्याचं वचन देत भाषणाची सुरुवात केली होती. त्यानंतर राजीव गांधींनी विश्व हिंदू परिषदेला राम मंदिराचा शिलान्यास करण्याची परवानगीसुद्धा दिली होती. तत्कालीन गृहमंत्री बूटा सिंह यांना या कार्यक्रमासाठी पाठवलं होतं.

राजीव गांधींनी चेन्नईमध्ये शेवटची पत्रकार परिषद घेतली होती. तेव्हा त्यांना राम मंदिराबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर राजीव गांधी म्हणाले होते की, अयोध्येतच राम मंदिर होईल. भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी देखील म्हटलं की, राम मंदिरासाठी जे लोक झटले त्यामध्ये राजीव गांधी, पीव्ही नरसिंह राव आणि अशोक सिंघल यांचे नाव घेता येईल.