
अखिल भारतीय श्रीरामजन्मभूमि पुनरुद्धार समितीकडून पक्षकार म्हणून सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडलेले स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या म्हणण्यानुसार श्री रामजन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्ट घटनाबाह्य व अवैध आहे.
नवी दिल्ली - अयोध्येत पाच ऑगस्टला राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. याविषयी देशभरात उत्सुकता आहे. मात्र राम मंदिर उभारणाच्या सरकारच्या काही निर्णयावरून काही संतांमध्ये नाराजीही आहे. अखिल भारतीय श्रीरामजन्मभूमि पुनरुद्धार समितीकडून पक्षकार म्हणून सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडलेले स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या म्हणण्यानुसार श्री रामजन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्ट घटनाबाह्य व अवैध आहे. कायद्यानुसार असा ट्रस्ट स्थापन होऊ शकत नाही.
रामजन्मभूमिसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात अनेक वेळा स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचा व त्यांनी दिलेल्या माहितीचा उल्लेख आला आहे. अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाची तयारी सुरू असली तरी याच्या मुहूर्तापासून तसेच ट्रस्टकडून भूमिपूजनाला निमंत्रण नसल्याच्या अनेक बाबींवर स्वामींनी त्यांचे विचार मांडले आहेत.
प्रश्न - राम मंदिराच्या भूमिपूजनाला जाणार आहात का?
उत्तर - नाही, ट्रस्टकडून मला निमंत्रण मिळालेले नाही आणि चातुर्मास असल्याने जाणे शक्य होणार नाही. चातुर्मास नसता तर निमंत्रण नसले तरी गेलो असतो. या कार्यक्रमाला मोठे संत उपस्थित राहू नयेत, म्हणूनच चातुर्मासात भूमिपूजन करण्याचा घाट घातला असल्याचे मला वाटते.
हे वाचा - हनुमान चालीसा म्हणा, कोरोनाला पळवा: प्रज्ञासिंह
प्रश्न - मंदिर उभारणीसाठी तुमचा सल्ला घेतला का?
उत्तर - नाही, माझाशी कोणतीही सल्लामसलत झालेली नाही. जगतगुरु शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय श्रीरामजन्मभूमि पुनरुद्धार समितीनेच सुरुवातीला राम मंदिरासाठी प्रयत्न केले. अलाहाबाद उच्च न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयातील या खटल्याच्या सुनावणीत मी पक्षकार म्हणून बाजू मांडली आहे. मात्र आता मंदिराबाबत माझ्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही आणि सल्ला घेतलेला नाही.
प्रश्न - भविष्यात ट्रस्टवर निवडक लोकांची मक्तेदारी असेल, असे वाटते का?
उत्तर - हो, ही विशेष लोकांच्याच ताब्यात ट्रस्ट आहे हे सत्य आहे. श्री रामजन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्ट नाव्याच्या या संस्थेला मंजुरी मिळाली असली तरी हा ट्रस्ट अवैध आहे. कायद्यानुसार असा ट्रस्ट स्थापन होऊ शकत नाही. याच्या निर्मितीसाठी जी प्रक्रिया करण्यात आली ती दोषी आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे हा ट्रस्ट सरकारच्या एक रुपयातून तयार झाला आहे. सरकार धर्मनिरपेक्ष असते. त्यांचा पैसा करातून मिळालेला असतो, अगदी मद्याच्या महसुलातून मिळालेला असतो. त्यामुळे असा पैसा कोणत्याही धार्मिक विशेष कार्यासाठी तो वापरणे गैर आहे.
हे वाचा - राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम घरबसल्या पाहायला मिळणार
प्रश्न - ट्रस्टच्या स्थापनेवर प्रश्न उपस्थित केले जातात. याबाबत काही वाद आहे का?
उत्तर - या ट्रस्टच्या निर्मितीपूर्वी १९९३ मधील अयोध्या विशेष भूमि अधिग्रहण कायद्यात स्पष्ट केले आहे की, कोणत्याही अन्य ट्रस्टकडे ही भूमी सोपविली जाणार नाही. यासाठी धर्मगुरुंचा रामालय ट्रस्ट आधीपासूनच होता. नव्या ट्रस्टची गरजच नव्हती. ट्रस्ट तयार केला तरी धर्मगुरुंची उपेक्षा करीत केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि विश्व हिंदू परिषदेच्या लोकांनाच ट्रस्टमध्ये सहभागी केले. जे आधी रामजन्मभूमि न्यासाचे सदस्य होते, तेच ट्रस्टवर आले. सत्तारुढ सरकारच्या समर्थकांची ट्रस्टमध्ये वर्णी लागली आहे. राम जन्मभूमिच्या प्रकरणात ज्यांचे योगदान आहे त्यांना डावलून ज्यांचा याच्याशी काहीही देणेघेणे नाही, ते आज ट्रस्ट सांभाळत आहेत.
Edited By - Suraj Yadav