राममंदिरासाठी ६५ टक्के कोरीव काम पूर्ण! (व्हिडिओ)

मंगेश कोळपकर
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

निकालानंतर...

  • उत्तर प्रदेशसह अयोध्येमध्येही शांतता
  • शरयू नदीत भाविकांची स्नानासाठी गर्दी
  • धर्मगुरूंशी अजित दोवाल यांची चर्चा
  • निकाल देणाऱ्या न्यायाधीशांच्या सुरक्षेत वाढ
  • सुन्नी बोर्डाची २६ नोव्हेंबर रोजी बैठक
  • आता मशिदीसाठी पाठपुरावा नाही : अन्सारी
  • वक्‍फ बोर्ड म्हणजे दुकानदारी : एम. एच. खान

अयोध्या - रामजन्मभूमीमध्ये नियोजित राममंदिर उभारण्यासाठी दगडांवर ६५ टक्के  कोरीव काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे अयोध्येतील प्रवक्ते प्रवक्ते शरद शर्मा यांनी ‘सकाळ’शी बोलताना आज दिली.

कारसेवकपुरममध्ये १९८९ मध्ये शिलापूजन झाल्यानंतर दगड घडविण्यास प्रारंभ झाला आहे. तेव्हापासून आतापर्यंत येथे गुजरात आणि राजस्थानमधून येणाऱ्या दगडांवर नक्षीदार कोरीव काम करून त्यातून खांब, कमानी तयार करून ते कारसेवकपुरममध्ये ठेवण्यात आले आहेत. मंदिराचा नियोजित आराखडा तयार करून येथे ठेवण्यात आला आहे. न्यायालयाने आता रामजन्मभूमीच्या बाजूने निकाल दिल्यामुळे मंदिराच्या कामाला वेग येईल, असे शर्मा यांनी सांगितले.  मंदिर उभारणीसाठी सुरुवातीला दान, देणगी याच्या माध्यमातून निधीसंकलन करण्यात येत होते; परंतु आता भाविक स्वेच्छेने मोठ्या प्रमाणात निधी देतात, त्यामुळे मंदिरासाठी निधीचा प्रश्‍न कधीच संपलेला आहे, असेही त्यांनी सांगितले.

कारसेवकपुरममध्ये गेल्या दोन दिवसांपासून वातावरण बदलले आहे. निकालामुळे सध्या काम थांबले आहे. आता ४०० ऐवजी पाचशे-सहाशे कारागीर आणून हे काम सुरू करण्यात येणार आहे, असे या ठिकाणी सांगण्यात आले.

आराखडा सरकारला देणार
राममंदिराच्या उभारणीसाठी ३ महिन्यांत आता केंद्र सरकार ट्रस्ट निर्माण करेल. अयोध्येतील विविध मठांचे महंत यांच्या मदतीने न्यासाने नियोजित मंदिराचा आराखडा तयार केला आहे. ट्रस्ट स्थापन झाल्यावर त्यांच्याकडे तो सोपविला जाईल. तो मंजूर झाल्यावर मंदिर उभारणीचे वेळापत्रक जाहीर करू, अशी माहिती रामजन्मभूमी न्यासातर्फे देण्यात आली. रामनवमीला भूमिपूजन करता येईल का, याचीही चाचपणी न्यास करीत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ram temple 65 percentage carving work completed