मोठी बातमी : राममंदिराच्या देणगी खात्यावर चोरट्यांनी मारला डल्ला; लाखो रुपये केले लंपास

वृत्तसंस्था
Thursday, 10 September 2020

रामजन्मभूमी ट्रस्टने मंदिर उभारणीसाठी लागणाऱ्या देणग्या जमा करण्यासाठी बॅंक खाते उघडले होते. या खात्यातूनच सुमारे सहा लाख रूपये लंपास झाले असल्याची माहिती बुधवारी (ता.९) समोर आली.

लखनौ : राम मंदिर हा देशातील हिंदूच्या आस्थेचा सर्वात मोठा विषय आहे. गेल्याच महिन्यात म्हणजे ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राममंदिराचं भूमिपूजन करण्यात आलं. राम मंदिराच्या उभारणीसाठी देशभरातून मोठ्या प्रमाणावर देणग्या जमा होत आहेत, पण देणग्या स्वीकारण्यासाठी उघडण्यात आलेल्या खात्यातूनच रक्कम गायब केल्याची घटना समोर आली आहे. या खात्यातून लाखो रूपये चोरट्यांनी लंपास केले आहेत. 

कर्जाच्या परतफेडीला 28 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ ​

रामजन्मभूमी ट्रस्टने मंदिर उभारणीसाठी लागणाऱ्या देणग्या जमा करण्यासाठी बॅंक खाते उघडले होते. या खात्यातूनच सुमारे सहा लाख रूपये लंपास झाले असल्याची माहिती बुधवारी (ता.९) समोर आली. चोरट्यांनी क्लोन चेकचा वापर करुन ही रक्कम चोरल्याची माहिती मिळत आहे. ही घटना लखनौमधील आहे. लखनौमधील दोन बॅंकामध्ये क्लोन चेकचा वापर करून मोठ्या चलाखीने चोरट्यांनी सहा लाखाच्या मोठ्या रकमेवर डल्ला मारला. 

फसवणूक करणाऱ्यांनी १ सप्टेंबर रोजी पहिल्यांदा लखनौमध्ये क्लोन चेकद्वारे काही रक्कम पंजाब नॅशनल बॅंकेच्या खात्यात जमा केली होती. त्यानंतर त्यांनी ८ सप्टेंबरला पुन्हा पीएनबीच्या खात्यात काही रक्कम जमा केली. एकूण सहा लाख रुपये फसवणूक करून दुसऱ्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.

देशात 4 मिनिटाला होतेय एक आत्महत्या, कौटुंबिक समस्या प्रमुख कारण​

तिसऱ्या वेळेस हाच प्रयत्न पुन्हा एकदा चोरट्यांनी केल्यावर मात्र त्यांना यश आले नाही. ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांच्या मोबाईलवर या रक्कम काढण्यासंदर्भात फोन आला. रक्कम अत्यंत मोठी असल्याने त्यांची परवानगी घेण्यासाठी म्हणून बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना फोन केला होता. आणि यामुळेच अशापद्धीने रक्कम काढली जात असल्याची माहिती त्यांना मिळाली. अयोध्येतील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत ट्रस्टचं खातं आहे. चंपत राय आणि ट्रस्टी डॉ. अनिल मिश्र यांच्याकडेच बॅंक खात्याचे सर्व अधिकार आहेत. 

मंदिराच्या निर्मितीसाठी रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या नावाने आजवर अनेकांनी बनावट बॅंक खाती उघडल्याची प्रकरणे समोर आली होती. मात्र यापद्धतीने थेट मुख्य खात्यातूनच फसवणुकीने रक्कम काढण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. अयोध्या पोलिसांनी या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ram Temple trust account defrauded of Rs 6 lakh