उद्धवजी 10 वेळा अयोध्येला गेले तरी राम मंदिर होणार नाही : आठवले

वृत्तसंस्था
रविवार, 9 जून 2019

लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी पहले मंदिर, फिर सरकार असा नारा दिला होता. नंतर त्यांनी आपली भूमिका बदलली होती. आता उद्धव ठाकरे आपल्या 18 खासदारांना घेऊन अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

नवी दिल्ली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येला एकदा काय, दहावेळा जरी गेले तरी मंदिर बनू शकत नाही, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी पहले मंदिर, फिर सरकार असा नारा दिला होता. नंतर त्यांनी आपली भूमिका बदलली होती. आता उद्धव ठाकरे आपल्या 18 खासदारांना घेऊन अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यापूर्वी आठवले यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना उद्धव ठाकरे दहावेळा अयोध्येला गेले तरी मंदिर होणार नाही असे म्हटले आहे.

आठवले म्हणाले, की अयोध्या प्रकरणी हे सर्वोच्च न्यायालयात आहे. सर्वोच्च न्यायालय जोपर्यंत काही निर्णय देत नाही, तोपर्यंत मंदिराची निर्मिती होऊ शकत नाही. उद्धव ठाकरेंना अयोध्येला जाण्याचा अधिकार आहे, त्यांना राम मंदिराची मागणी करण्याचा अधिकार आहे. मात्र, कायदा हातात न घेता, राम मंदिर बांधणे ही सरकारची भूमिका आहे. शिवसेना खासदार उद्धव ठाकरेंसोबत अयोध्येला जात आहेत, त्यांना शुभेच्छा. लोकांच्या भावनांचा विचार केला तर राम मंदिर व्हायला पाहिजे, या मताचा मी आहे. पण सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत आपल्याला थांबावे लागेल. हिंदू समाजाला जी जागा मिळेल, त्यात राम मंदिर बांधायला हवे. मात्र उद्धव ठाकरे त्याठिकाणी एकदा गेले काय आणि दहा वेळा जरी गेले, तरी त्यांच्या जाण्याने काही होणार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramdas Athawale Takes a dig On Shivsena Uddhav Thackeray Over Ram Mandir, Ayodhya Visit