बिहारमध्ये एनडीए आमदारांची आज बैठक; मुख्यमंत्रीपदी कोण बसणार?

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 15 November 2020

या बैठकीत, भाजपा, जेडीयू यांच्यासहित सहकारी पक्ष हिंदूस्तानी आवाम मोर्चा आणि विकासशील इन्सान पार्टीचे आमदारदेखील सामिल होणार आहेत.

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये निसटता विजय प्राप्त केल्यानंतर सत्ताधारी एनडीएची आज रविवारी एक महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत भाजप-जेडीयू यांच्या नेतृत्वातील एनडीएच्या मुख्य नेतृत्वावर शिक्कामोर्तब होईल. मुख्यमंत्री नितीश कुमार हेच बिहारचे पुढचे मुख्यमंत्री राहतील अशी दाट शक्यता आहे.

हेही वाचा - आधीच प्रदुषणाने हैराण, तरीही दिल्लीकरांनी फोडले फटाके; राजधानीत स्थिती गंभीर 

या बैठकीत, भाजपा, जेडीयू यांच्यासहित सहकारी पक्ष हिंदूस्तानी आवाम मोर्चा आणि विकासशील इन्सान पार्टीचे आमदारदेखील सामिल होणार आहेत. तसेच काही अपक्ष आमदारांनीही एनडीएला समर्थन देण्याची तयारी दाखवली आहे. एनडीएने निवडणुकीच्या आधीच नितीश कुमार यांना आपला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं होतं. भाजपाने याआधीच स्पष्टपणे सांगितलंय की, एनडीएमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळो, बिहारच्या मुख्यमंत्री पदी नितीश कुमारच राहतील.

नितीश कुमार यांचा मागचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी आधीच राज्यपाल फागू चौहान यांना आपला राजीनामा दिला आहे. राज्यपाल यांनी नितीश कुमार यांनी नवे सरकार बनण्याआधी तात्पुरत्या काळासाठी कार्यवाहक मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडायला सांगितले आहे. निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या पहिल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर नितीश कुमार यांनी म्हटलेलं की, एनडीएच्या आमदारांची बैठक लवकरच बोलावली जाईल. त्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला जाईल.   

हेही वाचा - चांगली बातमी! कोरोना लस येण्याआधीच भारतीयांमध्ये प्रतिकारशक्ती
भाजपाने भलेही निवडणुकीच्या निकालाआधीच हा विश्वास दिलाय की नितीश कुमार हेच मुख्यमंत्री पदी असतील मात्र, नितीश यांच्या चौथ्यांदा मुख्यमंत्री बनण्याबाबत अद्याप अडचणी आहेत. कारण या निडणुकीच्या निकालानंतर भाजप हा मोठा भाऊ ठरला आहे. या निडणुकीत भाजपला 74 जागा तर जेडीयूला फक्त 43 जागा प्राप्त झाल्या आहेत. 
एनडीएला विधानसभा निवडणुकीत 125 जागा  प्राप्त झाल्या आहेत. महागठबंधनने तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात एनडीएला ताकदीची टक्कर दिली होती. मतमोजणीपूर्व सर्व अंदाजांमध्ये बिहारमध्ये सत्ताबदलाचे वारे होते. मात्र, अगदी निसटत्या अशा स्वरुपाचा विजय एनडीएला प्राप्त झाला आहे. या निवडणुकीत चिराग पासवान यांच्या नेतृत्वातील लोजपामुळे जेडीयूची मते घटल्याचा अंदाज आहे. लोजपाने एनडीएशी फारकत घेऊन फक्त जेडीयूला विरोध करण्यासाठी आपले उमेदवार उभे केले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bihar Election National Democratic Alliance meeting today decision on who will be the cm