Corona Update : गेल्या 24 तासांत कोरोनाचे 44,684 नवे रुग्ण; 520 लोकांचा देशभरात मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 15 November 2020

देशातील कोरोना प्रादुर्भावामध्ये दिलासादायक घट झाली आहे. मात्र, असं असलं तरीही अद्याप देश धोक्याच्या बाहेर नाहीये.

नवी दिल्ली : देशातील कोरोना प्रादुर्भावामध्ये दिलासादायक घट झाली आहे. मात्र, असं असलं तरीही अद्याप देश धोक्याच्या बाहेर नाहीये. दररोज जवळपास 40 ते 50 हजारच्या दरम्यान नव्या रुग्णांची भरती होतच आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर दिवाळीनंतर देशात कोरोनाची दुसरी लाट येईल, असं बोललं जात आहे. युरोपातील अनेक देशात कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढायला सुरवात झाल्याने दुसऱ्यांदा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. भारतात जर खबरदारी न बाळगता ढिलाई केली गेली तर भारतातदेखील हीच परिस्थिती पुन्हा येऊ शकते. 

हेही वाचा - चांगली बातमी! कोरोना लस येण्याआधीच भारतीयांमध्ये प्रतिकारशक्ती

भारतात शनिवारी कोविड-19 चे नवे जवळपास 45 हजार रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह सध्या देशातील कोरोनाबाधितांची आजवरची एकूण संख्या ही 88 लाखांच्या जवळ जाऊन पोहोचली आहे. आतापर्यंत देशात 81,63,572 लोकांनी कोरोना या रोगावर मात करुन ते सहिसलामत घरी पोहोचले आहेत. सध्या देशातील रिकव्हरी रेट हा वाढला असून तो 93.04 झाला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 44,684 नवे रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ही 81,63,572 इतकी झाली आहे. 

हेही वाचा - आधीच प्रदुषणाने हैराण, तरीही दिल्लीकरांनी फोडले फटाके; राजधानीत स्थिती गंभीर

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 520 लोकांचा कोरोनामुळे देशभरात मृत्यू झाला आहे. या नव्या आकडेवारीसह देशातील एकूण कोरोनाबाधित मृतांची संख्या ही 1,29,188 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या देशातील मृत्यूदरातही घट झाली आहे. देशाचा मृत्यूदर 1.47 टक्के झाला आहे. देशात सध्या 4,80,719 रुग्ण उपचार घेत आहेत. म्हणजेच हे ऍक्टीव्ह रुग्ण आहेत. एकूण आजवरच्या कोरोनाबाधित रुग्णांच्या 5.48 टक्के ही संख्या आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona update India in Marathi corona report update 15 November 2020