आता रामदेव बाबाही म्हणतात कोरोना लस घेणार नाही

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 4 January 2021

भारतात दोन कोरोना लशींच्या आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे

नवी दिल्ली- भारतात दोन कोरोना लशींच्या आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे देशात लवकरच कोरोना वॉरियर्संना लस देण्याचे अभियान सुरु होणार आहे. त्यानंतर देशवासीयांना लस देण्याचे काम हाती घेण्यात येईल. असे असताना लस मिळण्यापूर्वीच योगगुरु रामदेव बाबा यांनी कोरोना लस टोचून घेणार नसल्याचं म्हटलं आहे. ते 'न्यूज 18' या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. 

मला कोरोना लशीची गरज नाही, त्यामुळे मी ती घेणार नाही. लशीमध्ये गायीची किंवा डुक्कराचीही चरबी नाही. तसेच हा हिंदू किंवा मुसलमानांचा विषय नाही. तो पूर्णपणे वैज्ञानिक संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे माझ्या निर्णयाला कोणत्याही धर्माशी जोडले जाऊ नये, असं योगगुरु रामदेव बाबा म्हणाले आहेत. 

सीमेवर तणाव; तरीही चिनी कंपनीला मिळालं भारतातील मेगा प्रोजेक्टचं कंत्राट

मी खुलेआम जाहीर करतो की मी लस टोचून घेणार नाही, कारण मला त्याची गरज नाही. मला कोरोना होणार नाही. मी अनेक लोकांना भेटत असतो, तसेच मी योग्य काळजीही घेत असतो. कोरोनाचे कितीही अवतार (स्ट्रेन) मला काहीही करु शकणार नाही. मला काही होणार नाही. आमचा योगावतार जिंदाबाद आहे, असं रामदेव  बाबा वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.  

कोरोना लस आता मिळणे सुरु होईल, पण असे असले तरी 2021 मध्ये सर्वसामान्य लोकांना लस मिळणे कठीण आहे. लस हे औषध नसून प्रतिंबधक उपचार आहे. मी लशीला विरोध करत नाही, पण सहा महिन्यांनतर लस प्रभावी राहते का, याबाबत काही स्पष्टता नाही. पण, जर तुम्ही दररोज योगासनं कराल, तर तुमची प्रतिकारशक्ती नेहमीच चांगली राहिल, असंही रामदेव बाबा म्हणाले. 

भारतीय वस्तूंचा दर्जा आणि विश्वासार्हता वाढवायला हवी- पंतप्रधान मोदी

जे लोक योग करतात त्यांना कोरोनाला घाबरण्याचे काहीही कारण नाही. ज्यांना लस घ्यावी वाटते त्यांनी नक्की घ्यावी. मी याच्या विरोधातही नाही आणि समर्थनातही नाही. सरकार आणि औषध कंपन्या करत आहेत, त्याचे परिणाम लवकरच समोर येतील. सर्वकाही चांगलं व्हावं, अशी माझी इच्छा आहे, असंही ते म्हणाले. 

दरम्यान, भारतात दोन कोरोना लशींच्या आपात्कालीन वापरासाठी परवानगी मिळाली आहे. यात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड (covishield) आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन (covaxine) या लशींचा समावेश आहे. सीरम ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनकासोबत मिळून लशीचे उत्पादन करत आहे. कोवॅक्सिन ही स्वदेशी लस असून भारत बायोटेक आणि आयसीएमआर मिळून याची निर्मिती करत आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ramdev baba will not take corona vaccine said i do not need