कोरोना झालेल्या 18 दिवसांच्या बाळाला जन्मदात्यांनी सोडलं मृत्यूच्या दारात; डॉक्टर बनले मायबाप

टीम ई सकाळ
Tuesday, 8 September 2020

बाळाला कोरोना झाल्यानं पळून गेलेल्या आई वडिलांना डॉक्टरांनी समजावण्याचा प्रयत्न केला. शेवटी डॉक्टर आता बाळाला वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत आहे. 

रांची - जगभर धुमाकूळ घालत असलेल्या कोरोनाने भारतातही आता कहर केला आहे. कोरोना झालेल्या रुग्णांची वाढत्या संख्येमुळं आरोग्य यंत्रणेवरही ताण आला आहे. यातच माणुसकीला काळीमा फासणाऱ्या काही घटना घडताना दिसतात. जवळचे लोकही कोरोनाच्या या संकटात दूर जात आहेत. आता झारखंडमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. झारखंडची राजधानी रांचीतील रिम्स रुग्णालयात 18 दिवसांच्या नवजात बाळाला सोडून आई-बाप पळून गेले. बाळाला कोरोना झाल्यानं पळून गेलेल्या आई वडिलांना डॉक्टरांनी समजावण्याचा प्रयत्न केला. शेवटी डॉक्टर आता बाळाला वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत आहे. सोमवारी बाळावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची देखरेख केली जात आहे.

डॉक्टर अभिषेक रंजन यांनी न्यूज 18 हिंदीशी बोलताना सांगितलं की, मुलीच्या आतड्याला जन्मापासूनच संसर्ग झालेला होता. सोमवारी सर्जरी करून आतड्याचा काही भाग काढून टाकण्यात आला असून बायपास करण्यात आलं आहे. बाळाची प्रकृती गंभीर असून 48 तास देखरेखीखाली ठेवलं आहे. बाळाची तब्येत ठीक झाली तर पुन्हा एकदा सर्जरी केली जाईल अशी माहिती डॉक्टरांनी दिली. 

हे वाचा - corona vaccine updates:भारतातील क्लिनिकल चाचणीसंदर्भात रशियाची मोठी घोषणा

नवजात बाळाला रिम्समध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांना शस्त्रक्रियेआधी त्याची कोरोना चाचणी केली. त्यामध्ये बाळाला कोरोना झाल्याचं समोर आलं. कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आई बापाने 18 दिवसांच्या चिमुकल्या बाळाला तिथंच सोडलं आणि पळाले. रिम्सच्या प्रशासनाने याची माहिती रांची जिल्हा प्रशासनाला दिली. एसडीओ रांची आणि गढवा प्रशासनाने पुढे येत बाळाच्या आजी आजोबांना विनंती केली तेव्हा ते रिम्समध्ये पोहोचले. आता आजी आजोबा बाळाची देखभाल करत आहेत. 

रिम्समध्ये कोरोना पॉझिटिव्ह बाळाचा जीव वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या  डॉक्टरांचे प्रशासन आणि आरोग्य मंत्र्यांनी कौतुक केलं. बाळ लवकरचं बरं व्हावं अशी प्रार्थना केली. आरोग्य मंत्री म्हणाले की, अनेक तास पीपीई किट घालून धैर्य आणि मानवतेच्या दृष्टीकोनातून डॉक्टरांनी बाळाला वाचवण्याचे प्रयत्न केले ते कौतुकास्पद आहेत. इतरांसाठी ते नक्कीच प्रेरणा देणारे आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ranchi mother and father leave new born baby in hospital after report corona positive