रावणाची छातीही 56 इंचाची होती; ममतांचा मोदींवर निशाणा

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

कोलकत्याला "सीबीआय'चे चाळीस अधिकारी पाठविणे हा केंद्राचा पश्‍चिम बंगालवरील हल्ला होता. मोदी राज्यघटना आणि लोकशाहीची वाट लावण्याचे काम करीत आहेत. 

- अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री दिल्ली 

नवी दिल्ली : पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज आम आदमी पक्षाच्या व्यासपीठावरून पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले. रावणाची छातीही छप्पन इंचाची होती, गुजरातमध्ये ज्यांनी लोकांचे रक्त पिले तीच मंडळी आता देशावर राज्य करीत आहेत, अशी टीका ममतांनी केली. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही पंतप्रधानांनी राफेलबाबतचे मौन सोडावे, असे म्हटले आहे. येथे "आप'च्या वतीने आयोजित 'लोकतंत्र बचाओ रॅली'मध्ये आज पुन्हा विरोधकांनी सरकारवर तोफ डागली. 

ममता म्हणाल्या, ""केंद्राने खुशाल सीबीआयला आमच्याकडे पाठवावे, मी त्यांना हाताने जेवण बनवून खाऊ घालेल. सध्या डेमोक्रसी ही मोदीक्रसी बनली असून, आणीबाणीपेक्षाही भीषण अवस्था सध्या निर्माण झाली आहे. राज्यामध्ये आमचा संघर्ष डाव्यासोबत असला, तरीसुद्धा राष्ट्रीय पातळीवर मात्र आम्ही एकत्र लढू. मोदी पुन्हा सत्तेत येऊ नये म्हणून आम्ही सर्व त्याग करायला तयार आहोत.''

ममतांनी या रॅलीच्या माध्यमातून कॉंग्रेसलाही संदेश दिला. जो ज्या ठिकाणी मजबूत आहे त्याने तेथे संघर्ष करावा. पश्‍चिम बंगालमध्ये आमची ताकद असल्याने तेथे आम्ही भाजपला भिडू. आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू हे भाजपशी टक्कर घेतील. दिल्लीमध्ये आम आदमी पक्ष आणि उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष भाजपशी दोन हात करेल,'' असे ममता यांनी सांगितले. 

कोलकत्याला "सीबीआय'चे चाळीस अधिकारी पाठविणे हा केंद्राचा पश्‍चिम बंगालवरील हल्ला होता. मोदी राज्यघटना आणि लोकशाहीची वाट लावण्याचे काम करीत आहेत. 

- अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री दिल्ली 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ravan chest was also 56 inch says Mamata Banerjee