केंद्र सरकारचे फेसबुकला पत्र; PM मोदींबद्दल कर्मचाऱ्यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 September 2020

वॉल स्ट्रिट जर्नलने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानंतर भारतात फेसबुकने भाजपसोबत युती केल्यावरून विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर टीका केली होती.

नवी दिल्ली - वॉल स्ट्रिट जर्नलने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानंतर भारतात फेसबुकने भाजपसोबत युती केल्यावरून विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. भाजपच्या पोस्टकडे फेसबुक कानाडोळा करत असल्याचं म्हणत विरोधकांनी निशाणा साधला होता. याप्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही फेसबुकला पत्र लिहिलं होतं. आता केंद्र सरकारनेच फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना पत्र लिहिलं आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रामध्ये म्हटलं की, फेसबुकचे कर्मचारी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल अपशब्द वापरतात. 

सध्या देशात फेसबुकच्या पक्षपातीपणावरून चाललेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हे पत्र केंद्राने लिहिलं आहे. रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं की, 2019 च्या निवडणुकी आधी फेसबुक इंडियाने दक्षिणपंथी विचारांच्या समर्थकांची पेजेस डिलिट केली. त्यांची पेजेस अधिक लोकांपर्यंत पोहचणार नाही यासाठी खबरदारी घेतली. मात्र फेसबुकला निष्पक्ष असायला हवं अशी अपेक्षाही रविशंकर प्रसाद यांनी पत्रात व्यक्त केली. रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं की, फेसबुक इंडियाच्या टीममधील अनेक वरिष्ठ अधिकारी एका विशिष्ट राजकीय विचारांचे समर्थक आहेत. त्यांच्याकडून पंतप्रधान आणि मंत्र्यांबद्दल अपशब्दांचा वापर केला जातो. 

दरम्यान, काँग्रेसनं भाजप आणि फेसबुक यांच्यात युती असल्याचा आरोप केला होता. काँग्रेसनं अमेरिकेतील वृत्तपत्राचा हवाला देत सोमवारी पुन्हा एकदा निशाणा साधला होता. हा डिजिटल साम्राज्यवाद असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. काँग्रेसचे वरिष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलं होतं की, फेसबुक इंडियाशी कनेक्ट असलेल्या लोकांची चौकशी होईपर्यंत कंपनीच्या प्रलंबित प्रस्तावांना मंजुरी मिळू नये असंही त्यांनी सांगितलं होतं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ravishankar prasd write letter to mark zukerberg