काठमांडूला जवळ करण्याची कसरत, लष्कर प्रमुखांच्या दौऱ्यापूर्वीच रॉ चीफ नेपाळमध्ये

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 22 October 2020

नेपाळने कालापानी, लिंपियाधुरा आणि लिपुलेखचा आपल्या नकाशात समावेश केला आहे. तेव्हापासून दोन्ही देशातील संबंधात दुरावा आला आहे.

नवी दिल्ली- हल्ली नेपाळ भारतासाठी चिंतेचा विषय बनला आहे. तेथील डावे सरकार चीनच्या इशाऱ्यावर काम करत आहे. त्यामुळे भारतासमोर कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. नेपाळच्या बदललेल्या धोरणामागे चीन असल्याची माहिती भारताला आहे. त्यामुळे भारताच्या रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंगचे (रॉ) प्रमुख सामंत गोयल बुधवारी नेपाळच्या दौऱ्यावर गेले. नेपाळच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार रॉ प्रमुख बुधवारी 9 सदस्यीय प्रतिनिधी मंडळ काठमांडूला गेले होते. 

नेपाळमधील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पुढील महिन्यात भारतीय लष्कर प्रमुख जनरल एम एम नरवणे यांचा दौरा प्रस्तावित आहे. अशात रॉ प्रमुखांचा दौरा खूप महत्त्वाचा मानला जातो. भारत आणि नेपाळदरम्यान जुने लष्करी संबंध आहेत. नेपाळने कालापानी, लिंपियाधुरा आणि लिपुलेखचा आपल्या नकाशात समावेश केला आहे. तेव्हापासून दोन्ही देशातील संबंधात थोडासा दुरावा आला आहे. 'टाइम्स नाऊ'ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

हेही वाचा- डोनाल्ड ट्रम्प यांचेच चीनशी संबंध; ‘न्यूयॉर्क टाइम्स’चा दावा

सीमा वाद सोडवण्यासाठी विदेश सचिव स्तरावर चर्चा करण्याची आमच्या मागणीला भारत प्रतिसाद देत नसल्याची नेपाळची तक्रार आहे. लष्कर प्रमुखांच्या दौऱ्यात या मागणीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. नेपाळी माध्यमांनुसार पंतप्रधान के पी ओली यांनी ईश्वर पोखरेल यांच्याकडून संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी मागे घेऊन भारताला सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. कारण पोखरेल हे भारत विरोधी मानले जातात. 

हेही वाचा- हा 'रिअ‍ॅलिटी शो' नाही, ही 'रिअ‍ॅलिटी' आहे, ओबामांचा ट्रम्प यांच्यावर निशाणा

भारताच्या मते नेपाळने सीमा वादावर चर्चेसाठी चांगले वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. नेपाळने भारताच्या भूभागाचा आपल्या नकाशात समावेश करुन उल्लंघन केले आहे. हा वाद चर्चेतून सोडवला जाऊ शकतो.

दरम्यान, रॉ प्रमुख सामंत गोयल यांच्या काठमांडू दौऱ्याच्या वृत्ताला भारत आणि नेपाळनेही दुजोरा दिलेला नाही. परंतु, हे वृत्त कोणी फेटाळलेही नाही. गोयल यांनी काठमांडूमध्ये पंतप्रधान के पी शर्मा ओली आणि माजी पंतप्रधान पुष्पकमल दहल यांच्याशी चर्चा केली असल्याचे वृत्त आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raw Chief Samat Goel Visit To Kathmandu Importance In The Pretext Of Map Dispute