हा 'रिअ‍ॅलिटी शो' नाही, ही 'रिअ‍ॅलिटी' आहे, ओबामांचा ट्रम्प यांच्यावर निशाणा

Obama
Obama

फिलाडेल्फीया : अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणुक अवघ्या काही दोन आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. ही निवडणुक जगाच्या राजकारणावर परिणाम करणारी ठरते. रिपब्लिक पक्षाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना डेमोक्रॅटीक पक्षाच्या जो बायडेन यांनी आव्हान दिले आहे. डेमोक्रॅटीक पक्षाकडून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राहिलेल्या बराक ओबामा यांनी काल बुधवारी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी म्हटलंय की ज्या व्यक्तीने स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी बेसिक स्टेप्स उचलले नाहीत तो व्यक्ती आपल्या सगळ्यांना वाचवण्यासाठी काहीही करणार नाहीये. 

फिलाडेल्फीयातील लिंकन फायनान्सियल फिल्डच्या बाहेर त्यांनी हे वक्तव्य केलं. ते म्हणाले की, कोरोनाच्या महामारीला सुरवात होऊन आठ महिने झाले. देशातील केसेस वाढत आहेत. डोनाल्ड ट्रम्प आपल्याला वाचवण्यासाठी काहीही करणार नाहीयेत कारण त्यांनी स्वत:ला वाचवण्यासाठी सुद्धा काही मूलभूत नियम पाळले नाहीयेत. 
डोनाल्ड ट्रम्प यांना काही दिवसांपूर्वी कोरोना होऊन गेला होता. त्यामुळे एक प्रेसिडेंन्शियल डिबेटही रद्द करावी लागली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी मास्क वापरण्यावरुन थट्टाही केली होती. या पार्श्वभूमीवर बराक ओबामा यांनी ही टीका त्यांच्यावर केली आहे. 

ते पुढे म्हणाले की, हा रिअ‍ॅलिटी शो नाही तर “रिअ‍ॅलिटी” आहे ज्यात लोकांनी आपली जबाबदारी गांभीर्याने पार पाडली नाही तर त्याच्या परिणामांना भोगावं लागतं. कमला आणि जो बायडेन यांच्याबद्दल दररोज ट्रम्प जे बरळतात त्यावर लक्ष देण्याची गरज नाही. ट्विटरवर ते ज्या खुळचट थेअरी टाकतात, त्यावरही लक्ष देण्याची गरज नाही. 

ते लोकांना दुष्ट, विभाजनवादी आणि वर्णद्वेषी बनण्यास प्रोत्साहन देतात. यामुळे आपल्या समाजाच्या मूळ ढाच्यालाच धक्का बसला आहे. त्यामुळे आपल्या मुलांवर परिणाम होतोय आणि आपल्या कुंटुंबाच्या भविष्यावर देखील परिणाम होतोय. या अशा वागण्याने फरक पडतोय, या अशा चारित्र्याने समाजावर नकारात्मक फरक पडतोय, असंही त्यांनी म्हटलं. 

पुढे त्यांनी म्हटलं की तरीही मी गेल्या चार वर्षांत आशा सोडली नाहीये. आशा ठेवणे म्हणजे आंधळी सकारात्मकता नव्हे, किंवा अडचणींना दुर्लक्ष करणेही नव्हे. आशा म्हणजे अडचणींवर आपण मात करु शकू असा विश्वास बाळगणे आणि चांगल्या जगासाठीची आशा धरणे. आणि म्हणूनच मी गेल्या चार वर्षांत कधी आशा सोडलेली नाहीये. मी त्रासलो आहे, वैतागलो आहे मात्र मी कधीच आशा सोडलेली नाहीये. कारण एका सरळ रेषेत सरकूनच प्रगती होते असं मी कधीच मानलं नाही. 

येणारे 13 दिवस हे येत्या दशकांसाठी महत्वाचे ठरणार आहेत. अवघ्या तेरा दिवसांवर येऊन ठेपलेल्या मतदानाच्या तारखेचा हवाला देऊन त्यांनी म्हटलं. आपल्याला अशी आणखी चार वर्षे ही परवडणारी नाहीयेत. आपण अधिक मागे जाऊ. इतके की आपण ज्या खड्ड्यात बुजले गेलो आहोत, त्यातून बाहेर पडणं देखील अवघड होऊन बसेल. 
कोरोना महामारीला लक्षात ठेवून मतदान करा, असं त्यांनी आवाहन केलं. त्यांनी म्हटलं की ही महामारी कोणत्याही राष्ट्राध्यक्षासाठी अवघडच ठरली असती मात्र, ज्या प्रमाणात नुकसान झालंय, ज्या प्रमाणात लोक लोक मृत्यूमुखी पडलेत ते प्रमाण नक्कीच कमी झालं असतं जर योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळली गेली असती, असंही त्यांनी म्हटलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com