कोलकत्यात घरांच्या विक्रीला नोटाबंदीचा मोठा फटका

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 जानेवारी 2017

कोलकता  : शहरातील घरांची विक्री मागील वर्षातील जुलै ते डिसेंबर या सहामाहीत 20 टक्‍क्‍यांनी घसरली, अशी माहिती जागतिक मालमत्ता सल्लागार नाइट फ्रॅंकच्या अहवालात समोर आली आहे. नोटाबंदीचा फटका घरांच्या विक्रीला बसला आहे.

कोलकता  : शहरातील घरांची विक्री मागील वर्षातील जुलै ते डिसेंबर या सहामाहीत 20 टक्‍क्‍यांनी घसरली, अशी माहिती जागतिक मालमत्ता सल्लागार नाइट फ्रॅंकच्या अहवालात समोर आली आहे. नोटाबंदीचा फटका घरांच्या विक्रीला बसला आहे.

नव्या गृह प्रकल्पांमध्ये 2016 च्या दुसऱ्या सहामाहीत आठ टक्के घसरण झाली आहे. तसेच, 2015 च्या तुलनेत याच काळात घरांची विक्री 20 टक्‍क्‍यांनी घसरली आहे, असे अहवालात म्हटले आहे. नाइट फ्रॅंक इंडियाचे मुख्य अर्थतज्ज्ञ सामंतक दास म्हणाले, ""घरांच्या विक्रीतील घसरण ही प्रामुख्याने नोटाबंदीमुळे निर्माण झालेल्या रोकड टंचाईचा परिणाम आहे. तसेच, ग्राहक व्याजदरात कपात होण्याची प्रतीक्षा करीत आहेत हेही एक कारण आहे. मुंबई आणि बंगळूर शहरांच्या तुलनेत कोलकता शहरात घरांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे.''

अहवालात म्हटले आहे, की मागील वर्षातील दुसऱ्या सहामाहीत घरांच्या किमती स्थिर राहिल्या असल्या, तरी घरांची बाजारपेठ अगदी ठप्प झाली आहे. मागील वर्षातील पहिल्या सहामाहीत मात्र कोलकत्यातील बाजारपेठ स्थिर होती आणि त्यात उत्तरार्धामध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. नोटाबंदीमुळे बाजारपेठेची स्थिती पूर्णपणे पालटली. विकसक आणि ग्राहक मालमत्तेशी निगडित कोणतेही व्यवहार करण्यापासून दूर राहिले.

Web Title: real estate house sale affected by note ban