जम्मू-काश्‍मीरमध्ये दोन दशकांतील सर्वाधिक पावसाची नोंद 

वृत्तसंस्था
शनिवार, 22 एप्रिल 2017

सर्वसाधारणत: एप्रिलमध्ये तापमानात वाढ किंवा घट होण्याचे प्रमाण लक्षणीय नसते. मात्र, यंदा एप्रिलमध्ये पहिल्याच आठवड्यात 24 तासांमध्ये श्रीनगरमध्ये 83 मिलीमीटर पाऊस पडला. गेल्या दोन दशकांतील ही एप्रिलमधील सर्वाधिक पावसाची नोंद आहे.

श्रीनगर : यंदाच्या एप्रिलमध्ये काश्‍मीरमध्ये गेल्या दोन दशकांतील सर्वाधिक पावसाची नोंद झाली, अशी माहिती वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी काल (शुक्रवार) दिली. जम्मूमध्ये आज (शनिवार) सकाळी पाऊस पडल्याने तापमानात आणखी घट झाली आहे. येत्या 24 तासांत राज्यात आणखीही काही ठिकाणी पावसाची शक्‍यता आहे, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. 

सर्वसाधारणत: एप्रिलमध्ये तापमानात वाढ किंवा घट होण्याचे प्रमाण लक्षणीय नसते. मात्र, यंदा एप्रिलमध्ये पहिल्याच आठवड्यात 24 तासांमध्ये श्रीनगरमध्ये 83 मिलीमीटर पाऊस पडला. गेल्या दोन दशकांतील ही एप्रिलमधील सर्वाधिक पावसाची नोंद आहे. यापूर्वी 15 एप्रिल 1997 रोजी 62.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. 

'यंदाच्या एप्रिलमध्ये श्रीनगर वगळता राज्याच्या इतर भागांमध्येही चांगल्या पावसाची नोंद झाली आहे,' अशी माहिती वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी दिली. बनिहालमध्ये या महिन्यात 90 मिलिमीटर पाऊस पडला. 'बनिहालमधील पाऊसही गेल्या दोन दशकांतील सर्वाधिक आहे. येथील आजवरची विक्रमी नोंद 5 एप्रिल 1994 रोजी झाली होती. त्यावेळी 116.4 मिलिमीटर पाऊस पडला होता,' असेही वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

भूस्खलनाने दोन ठार 
किश्‍तवारमध्ये भूस्खलन होऊन एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला. हे दोघेही एकाच गाडीतून प्रवास करत होते.

Web Title: Record rainfall in Kashmir this April