देशात गोठवणारी थंडी; दिल्लीसह आठ राज्यांमध्ये रेड अलर्ट, 68 जणांचा मृत्यू

red.jpg
red.jpg

दिल्ली : देशभरात मोठ्या प्रमाणात थंडीची लाट आली आहे. उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली असून, राजधानी दिल्लीसह हवामान विभागाकडून देशातील आठ राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशात काही भागांत पारा शून्याखाली गेला आहे.

दरम्यान, थंडीमुळे उत्तर प्रदेशमध्ये 68 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. उत्तराखंडमधील आठ शहरांमध्येही तापमान 2 अंशांखाली आहे. चमोलीमधील जोशीमठ आणि कुमाऊंच्या मुक्तेश्वर येथे ते शून्याखाली गेले आहे. हिमाचल प्रदेशातील कांगडा, मंडी, सोलन, सिरमौर व उना येथेही थंडीची लाट आहे. राजस्थानातील अनेक जिल्ह्यांत तापमानाचा पारा शून्याखाली आला आहे. पिलानीमध्ये उणे 0.5 इतके तापमान नोंदविले गेले. फतेपूरमध्ये तापमान उणे 3 होते.

दरम्यान, हवामान विभागाने पंजाब, हरयाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच मध्य प्रदेशमध्येदेखील येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामानाची परिस्थिती अत्यंत वाईट असते तेव्हाच रेड अलर्ट जारी केला जातो.

दिल्लीतील थंडीने मागील जवळपास १२० वर्षांपासूनचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, दिल्लीतील अनेक भागात तापमानाचा पारा २ अंश सेल्सिअसपेक्षा खाली गेला आहे. गेल्या १४ दिवसांपासून दिल्लीत तापमान १० अंश सेल्सियसच्या खाली घसरले आहे.

तसेच जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशासह उत्तर प्रदेश, हरयाणा, पंजाब, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश, उत्तराखंड, लडाख, हिमाचल प्रदेश, झारखंड या राज्यांमध्ये थंडीची लाट आली आहे. तर, राजस्थानच्या पाच शहरांमध्ये पारा पाच अंश सेल्सियसच्या खाली घसरलाय. दिल्लीतील यंदाचा हिवाळा हा सन १९०१नंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा गारठवणारा हिवाळा ठरला आहे.

दिल्लीतल्या थंडीचा विमान आणि रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झालाय. हावडा एक्सप्रेस, नवी दिल्ली पूर्वी एक्सप्रेससह इतर २४ रेलगाड्या पाच तास उशिराने धावत आहेत. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबर रोजी मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी तर 1 जानेवारी रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या पर्वतीय भागांत सतत होणारी बर्फवृष्टी आणि थंड वारे यांमुळे अवघा उत्तर भारत तीन दिवसांपासून पार गारठून गेला आहे. त्यामुळे अनेक व्यवहार ठप्प झाले असून, अनेक राज्यांमध्ये शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com