गुजरातमध्ये होणार जगातील सर्वात मोठं प्राणीसंग्रहालय; रिलायन्स करतंय उभारणी!

वृत्तसंस्था
Monday, 21 December 2020

जगातील सर्वात उंच, सर्वात मोठे आणि सर्वात लांब प्रकल्प गुजरातमध्ये पाहायला मिळणार आहे.

जामनगर : गुजरातमध्ये जगातील सर्वात मोठं प्राणीसंग्रहालय उभारण्यात येणार आहे. आणि हे प्राणी संग्रहालय रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीतर्फे उभारण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे अतिरिक्त मुख्य सचिव एम. के. दास यांनी दिली आहे. 

गुजरातमधील जामनगर येथे येत्या दोन वर्षात हे प्राणी संग्रहालय उभं राहणार असून ते पर्यटकांसाठी खुलंही करण्यात येणार आहे. जामनगरच्या मोती खवडी जवळील रिलायन्स रिफायनरी प्रकल्पाजवळ उभारण्यात येणार आहे. जवळपास ३०० एकर जमिनीवर ते उभारण्यात येणार आहे. आणि या प्राणीसंग्रहालयात जगभरातील सुमारे १०० हून अधिक विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी पाहायला मिळणार आहेत. 

पत्नी तृणमूलमध्ये गेल्यानं भाजप खासदार देणार घटस्फोट​

असं असणार जगातील सर्वात मोठं प्राणीसंग्रहालय
जगातील सर्वात मोठ्या ठरणाऱ्या या प्राणीसंग्रहालयात नाइट सफारीही करता येणार आहे. फ्रॉग हाऊस, ड्रॅगन लँड, मार्शेस ऑफ वेस्ट कोस्ट, इंडियन डेजर्ट एंड एक्जोटिक आयलँड, लँड ऑफ रोडेन्ट, इन्सेक्टोरियम, अॅक्वेटिक किंग्डम यांसारखे वेगवेगळे विभाग या संग्रहालयात असणार आहेत.

जगभरातील प्राणी-पक्षी
आशियाई सिंह, वाघ, बिबट्यांशिवाय आफ्रिकी वाघ, चित्ता, कोल्हा, आशियाई वाघ, पिग्मी हिप्पो, ओरंगुटन, बंगाल टायगर, गोरिला, झेब्रा, जिराफ, आफ्रिकी हत्ती, कोमोडो ड्रॅगन, बार्किंग डियर्स, फिशिंग कॅट्स, स्लोथ बीयर्स, लांडगे, सारंग यांसारख्या प्राण्यांचा समावेश आहे. तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या चिमण्या, पक्षीदेखील या संग्रहालयात पाहायला मिळतील. फ्रॉग हाऊसमध्ये २०० विविध प्रकारचे बेडूक आणि अॅक्वेटिक किंगडममध्ये ३५० प्रकारचे मासे असणार आहेत. 

किसान एकता मोर्चाचं पेज ब्लॉक का केलं? फेसबुकनं दिलं स्पष्टीकरण

रिलायन्स कॉर्पोरेट अफेअरचे संचालक परिमल नाथवानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या संग्रहालयात विविध जातीचे प्राणी, पक्षी आणि सरपटणारे जीव ठेवण्यात येणार आहेत. या प्रकल्पाला ग्रीन्स जिऑलॉजिकल रेस्क्यू अॅण्ड रिहॅबिलिटेशन किंग्डम असे नाव देण्यात येणार आहे. प्रकल्प उभारणीचं काम मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी हे पाहत असून केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व विभागांची परवानगी घेण्यात आली आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे या प्रकल्पात थोडा खंड पडला होता. त्यामुळे हा प्रकल्प २ वर्षात तयार होईल, अशी माहितीही नाथवानी यांनी दिली. 

शहांचे आरोप म्हणजे खोट्या आरोपांचा कचरा; ममता बॅनर्जी यांचे टीकास्त्र​

गुजरातच्या नावावर आहेत विक्रम
जगातील सर्वात उंच, सर्वात मोठे आणि सर्वात लांब प्रकल्प गुजरातमध्ये पाहायला मिळणार आहे. जगातील सर्वात मोठा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटीसोबत सर्वात लांब सिंचन कालवा आणि सर्वात मोठा विद्युत प्रकल्प असलेले धरण, सर्वात मोठा नूतनीकरणयोग्य असा अक्षय ऊर्जा प्रकल्प गुजरातमध्ये आहे. आता जगातील सर्वात मोठ्या प्राणीसंग्रहालयाच्या उभारणीमुळे केवळ भारतातूनच नाही तर जगभरातील पर्यटक मोठ्या संख्येने याठिकाणी येऊ शकतील. जागतिक पर्यटनाच्या नकाशावर गुजरातची वेगळी ओळख यामुळे उदयास येईल. 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reliance Industries to build worlds largest zoo in Gujarats Jamnagar