छायाचित्रांबाबतची माहिती देण्यास 'पीएमओ'चा नकार

पीटीआय
सोमवार, 8 मे 2017

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रांचा जाहिरातींमध्ये वापर करण्यासाठी परवानगी मागणाऱ्यांची माहिती उघड करण्यास पंतप्रधान कार्यालयाने नकार दिला आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रांचा जाहिरातींमध्ये वापर करण्यासाठी परवानगी मागणाऱ्यांची माहिती उघड करण्यास पंतप्रधान कार्यालयाने नकार दिला आहे. याबाबतची गोपनीय माहिती आम्ही उघड करू शकत आणि अशी माहिती देण्यासाठी मोठ्या प्रमाणात शोधमोहीम राबवावी लागणार आहे, असे "पीएमओ'तर्फे सांगण्यात आले.

"पीटीआय'च्या पत्रकाराने माहिती अधिकार कायद्याच्या (आरटीआय) अंतर्गत याबाबतची माहिती मागितली होती; मात्र अशा प्रकारची माहिती गोळा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्‍यकता असून, ही माहिती एकत्रित स्वरूपात उपलब्ध नाही. त्यामुळे ही माहिती देणे शक्‍य नाही, असे "पीएमओ'ने म्हटले आहे.

रिलायन्स जीओ आणि पेटीएम या कंपन्यांनी आपल्या जाहिरातींमध्ये पंतप्रधान मोदींच्या छायाचित्रांचा वापर केला होता. त्यासाठी या कंपन्यांनी परवानगी घेतली नसल्याचे "पीएमओ'कडून या पूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Request of information rejected by PMO