श्रीदेवीच्या मृत्यूमागे दाऊदचा हात

वृत्तसंस्था
बुधवार, 23 मे 2018

''दुबई पोलिसांनी श्रीदेवीचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे सांगितले. मात्र, त्यांचा मृत्यू ज्या हॉटेलमध्ये झाला. ते हॉटेल अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे आहे. दुबईमध्ये दाऊद इब्राहिमचे वर्चस्व आहे''.

- वेद भूषण, माजी पोलिस अधिकारी

नवी दिल्ली : अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूचे गूढ उलगडत आहे. त्यांच्या मृत्यूबाबत नवा खुलासा दिल्लीचे माजी अतिरिक्त पोलिस आयुक्त वेद भूषण यांनी केला आहे. ''श्रीदेवीच्या मृत्यूमागे कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हात आहे'', असा दावा वेद भूषण यांनी केला. 

वेद भूषण म्हणाले, की दुबई पोलिसांनी श्रीदेवीचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे सांगितले. मात्र, त्यांचा मृत्यू ज्या हॉटेलमध्ये झाला. ते हॉटेल अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे आहे. दुबईमध्ये दाऊद इब्राहिमचे वर्चस्व आहे. याबाबत वेद भूषण यांच्यासह एका खासगी तपास संस्था आणि त्यांच्या पथकाने दावा केला, की श्रीदेवीचा मृत्यू हे केले गेलेले षड्यंत्र होते. 'पोलिस सोल्यूशन इंडिया' ही एक खासगी संस्था असून, या संस्थेने दुबईतील 'हॉटेल एमिरेटस् टॉवर्स'मध्ये श्रीदेवीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर वेद भूषण यांनी याबाबतचा खुलासा पत्रकार परिषदेत केला.  

वेद भूषण यांनी दावा केला, की श्रीदेवीच्या मृत्यूची चौकशी करणाऱया दुबई पोलिसांनी तपासात दुर्लक्ष केले असून, ते लगेचच निष्कर्षापर्यंत गेले. तसेच त्यांनी श्रीदेवी यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. मात्र, त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्यात आली नाही. 

Web Title: Retired ACP Of Delhi Police said Actress Sridevis Death Dawood Ibrahim Hand In It