'ओव्हरटाइमचे पैसे परत करा' !

वृत्तसंस्था
सोमवार, 16 जुलै 2018

सहयोगी बॅंकांतील कर्मचाऱ्यांना नोटाबंदीदरम्यान केलेल्या अतिरिक्त कामाच्या बदल्यात मिळालेले मानधन त्यांनी परत करावे, असे निर्देश आज स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (एसबीआय) दिले आहेत. या निर्णयाबद्दल सहयोगी बॅंकांच्या कर्मचाऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 
 

नवी दिल्ली - सहयोगी बॅंकांतील कर्मचाऱ्यांना नोटाबंदीदरम्यान केलेल्या अतिरिक्त कामाच्या बदल्यात मिळालेले मानधन त्यांनी परत करावे, असे निर्देश आज स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (एसबीआय) दिले आहेत. या निर्णयाबद्दल सहयोगी बॅंकांच्या कर्मचाऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 

नोटाबंदीदरम्यान या बॅंकांतील 70 हजारांपेक्षा अधिक कर्मचारी अहोरात्र राबले. या बदल्यात त्यांना मानधन देण्याचे आश्वासनही दिले होते. हे मानधन त्यांना अदाही करण्यात आले. मात्र आता त्यांनी ते परत करावे, असे "एसबीआय'चे म्हणणे आहे. याबाबत बॅंकेच्या व्यवस्थापनाकडून सर्व विभागीय कार्यालयांना एक पत्रक पाठविण्यात आले असून, त्यात हे मानधन सहयोगी बॅंकांतील कर्मचाऱ्यांसाठी नसून, ते केवळ "एसबीआय'मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांसाठीच असल्याचे नमूद आहे. त्यामुळे हे मानधन त्यांच्याकडून परत घ्यावे, अशा सूचना एसबीआयने पत्रकाद्वारे केल्या आहेत. 

डिसेंबर 2016 मध्ये नोटाबंदीनंतर देशभरात खळबळ उडाली होती. परिस्थिती हाताळण्यासाठी या कर्मचाऱ्यांना त्या वेळी सुमारे 3 ते 8 तास अतिरिक्त काम करावे लागले. अधिकाऱ्यांना या जादा कामासाठी 30 हजार, तर इतर कर्मचाऱ्यांना सुमारे 17 हजार इतके मानधन अदा करण्यात आले होते. 

हेही एक कारण... 
1 एप्रिल 2017 मध्ये स्टेट बॅंक ऑफ पतियाळा, हैदराबाद, मैसूर, त्रावणकोर, बिकानेर तसेच स्टेट बॅंक ऑफ जयपूर यांचे "एसबीआय'मध्ये विलीनीकरण झाले होते. वास्तविक हे विलीनिकरण नोटाबंदीनंतर झाले असल्याने या बॅंकातील कर्मचाऱ्यांना मानधन देण्याची जबाबदारी "एसबीआय'ची नसून, ती संबंधित बॅंकांचीच आहे, असेही या पत्रकात म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: return compensation paid for working overtime during note ban