कुरआनच्या प्रती वाटण्याच्या आदेशामुळे अस्वस्थ : रिचा भारती

वृत्तसंस्था
बुधवार, 17 जुलै 2019

मुस्लिम समुदायाला लक्ष्य करून फेसबुकवर चिथावणीखोर पोस्ट शेअर करणाऱ्या रिचा भारती या तरूणीला जिल्हा न्याय दंडाधिकाऱ्यांनी दंड म्हणून पवित्र कुरआन या धर्मग्रंथाच्या काही प्रती शहरातील विविध वाचनालयांना भेट म्हणून देण्याचे आदेश दिले. या अटीवरच भारती यांना न्यायालयाने जामीनही मंजूर केला.

रांची : मी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करते, पण फेसबुक पोस्टसाठी दुसऱ्या धर्माच्या (इस्लाम) केंद्रावर जाऊन त्यांचा धर्मग्रंथ कुरआनच्या प्रती वाटण्याच्या आदेशामुळे मी अस्वस्थ झाले आहे. मला खूप वाईट वाटतंय, असे रांची विमेन्स महाविद्यालयाची विद्यार्थीने रिचा भारती हिने म्हटले आहे.

मुस्लिम समुदायाला लक्ष्य करून फेसबुकवर चिथावणीखोर पोस्ट शेअर करणाऱ्या रिचा भारती या तरूणीला जिल्हा न्याय दंडाधिकाऱ्यांनी दंड म्हणून पवित्र कुरआन या धर्मग्रंथाच्या काही प्रती शहरातील विविध वाचनालयांना भेट म्हणून देण्याचे आदेश दिले. या अटीवरच भारती यांना न्यायालयाने जामीनही मंजूर केला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मनिषकुमार सिंह यांच्यासमोर आज या खटल्याची सुनावणी झाली. पोलिसांच्या उपस्थितीमध्ये रिचा भारती यांच्या हस्ते कुरआनची एक प्रत स्थानिक अंजुमन समितीला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले तसेच या ग्रंथाच्या चार प्रती शहरांतील विविध वाचनालयांना देण्यास सांगण्यात आले. या संदर्भातील पोच पावत्या आठवडाभरामध्ये सादर करा असेही न्यायालयाने म्हटले आहे. यानंतर रिचाने एका वाहिनीशी बोलताना आपले मत व्यक्त केले.

रिचा म्हणाली, न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करते पण त्याचसोबत मला उच्च न्यायालयात माझी बाजू मांडण्याचाही अधिकार आहे. कुणी माझ्या मुलभूत अधिकारांचा भंग कसा काय करु शकते? फेसबुकवर स्वतःच्या धर्माबाबत लिहिणं कोणता गुन्हा आहे? मी एक सामान्य विद्यार्थिनी असतानाही मला अचानक अटक करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Richa Bharti Will File Appeal In High Court Against Lower Court Order