तुम हमे CM करो, हम तुम्हे PM बनायेंगे; नितीश कुमारांना राजदकडून हटके ऑफर

nitish kumar
nitish kumar

पाटना : बिहारमध्ये भाजपा-जेडीयूच्या नेतृत्वातील एनडीएच्या सरकारला फक्त दोनच महिने पूर्ण झाले आहेत. मात्र, अनेकदा या दोन्हीही पक्षात वादाचे मुद्दे समोर आले आहेत. असं असलं तरीही दोन्हीही पक्ष सातत्याने युती मजबूत असल्याचाच पुनरुच्चार करत आहेत. अरुणाचल प्रदेशातील जेडीयूच्या सातपैकी सहा आमदारांना फोडल्यानंतर भाजपा आणि जेडीयू मधला तणाव कायम आहे. या नाजूक परिस्थितीचा फायदा घेतच राष्ट्रीय जनता दलाने एक डाव खेळला आहे. राजदने जेडीयूला एक ऑफर देऊ केली आहे. त्यांनी म्हटलंय की तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री बनवावं आणि 2024 मध्ये नितीश कुमार यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार बनवण्यामध्ये राजद त्यांना समर्थन देईल. याबाबतचे वृत्त 'नवभारत टाइम्स'ने दिले आहे.

राजदने दिली नितीश कुमारांना ऑफर
राष्ट्रीय जनता दलाचे दिग्गज नेता आणि बिहार विधानसभेचे माजी सभापती उदय नारायण चौधरी यांनी ही ऑफर दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, जर नितीश कुमार एनडीएपासून फारकत घेत असतील आणि तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री बनवत असतील तर राजद 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नितीश कुमार यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करण्यासाठी समर्थन करुन मदत करेल. 

उदय नारायण चौधरी यांनी पुढे म्हटलंय की, नितीश कुमार यांच्यासाठी आता दिल्लीकडे कूच करण्याची वेळ आली आहे. आता त्यांना केंद्राच्या राजकारणात पाऊल ठेवलं पाहिजे. केंद्रात सातत्याने सक्षम विरोधी नेतृत्वाची पोकळी असून नितीश ती पोकळी भरुन काढण्यात सक्षम आहेत. तसेच 2024 च्या लोकसभेसाठी ते पंतप्रधान पदाचे उमेदवार देखील बनू शकतात. विशेष म्हणजे याआधी नितीश कुमार यांनी स्वतः मला मुख्यमंत्री बनण्याची जराही इच्छा नव्हती, मात्र माझ्यावर हे पद स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यात आला. त्यामुळे मी दबावामध्ये हे पद स्वीकारल्याचं वक्तव्य केलं होतं. अशा पार्श्वभूमीवर राजदने दिलेली ही ऑफर महत्त्वपूर्ण मानली जात आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com