कसली देशभक्ती? जिथं TRP आणि निवडणुकीच्या फायद्यासाठी केला शहीद जवानांचा वापर

टीम ई-सकाळ
Monday, 18 January 2021

केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना याचा यूजलेस असा उल्लेख केला होता. त्यानंतर देशभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली गेली होती.

पटना : रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी आणि बार्कचे माजी सीईओ पार्थ दासगुप्ता यांच्यामध्ये व्हॉट्सअॅपवर झालेलं चॅटिंग उजेडात आलं अन् नव्या वादाला तोंड फुटलं. आधीच कृषी कायद्यांवरून तोंडावर पडलेल्या केंद्र सरकारला आणखी कोंडीत पकडण्याची आयती संधी विरोधकांच्या हाती आली आहे. विरोधकांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी उचलून धरली आहे.

अशातच राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे. शहीद जवानांच्या बलिदानाचा वापर टीआरपी आणि निवडणुकीसाठी केल्याचा घणाघात त्यांनी भाजपवर केला आहे. 

Big Breaking: ममतादीदींनी गड बदलला; भाजपच्या बालेकिल्ल्यातून निवडणूक लढणार!​

अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्यातील चॅटिंग सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. वेगवेगळ्या प्रकरणांत आरोपी असलेल्या गोस्वामी यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अतिशय संवेदनशील आणि गोपनीय माहिती एका रिपोर्टला कशी मिळाली, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी विरोधक करत आहेत. या प्रकरणाची चौकशी संसदेच्या संयुक्त समितीअंतर्गत करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. 

Video: बायकोला किस करायची पण पंचाईत झालीय; बड्या नेत्याचं भर सभेत वक्तव्य​

हाच मुद्दा उपस्थित करत तेजस्वी यादव यांनीही भाजपवर ताशेरे ओढले आहेत. याबाबत यादव यांनी एक ट्विट केलं आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, 'ही कसली देशभक्ती, जिथं शहीद जवानांच्या बलिदानाचा वापर टीआरपी आणि निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी केला. यापेक्षा दुर्दैवी आणि निंदनीय कृत्य दुसरं असू शकत नाही. आपल्या देशाला माफीनामा आणि जवानांच्या बलिदानाचा सौदा करणाऱ्या देशभक्तीची गरज नाही. या प्रकरणाची संसदीय समितीद्वारे चौकशी व्हावी.'

Farmers Protest : 26 जानेवारीच्या ट्रॅक्टर परेडबाबत सुप्रीम कोर्टाची सुनावणी टळली​

गोस्वामी आणि दासगुप्ता यांच्यातील चॅटिंगवर पडदा टाकण्याचा प्रयत्नही काहीजण करत आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना याचा यूजलेस असा उल्लेख केला होता. त्यानंतर देशभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली गेली होती. गोस्वामी यांनी चॅटिंगमध्ये आपल्याला केंद्रातील मंत्र्यांचा पाठिंबा असल्याचे म्हटले होते. फेब्रुवारी २०१९ पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० जवान शहीद झाले होते. याबाबत गोस्वामी यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RJD leader Tejashwi Yadav demand inquiry about Arnab Goswami viral whatsapp chat