#Positive Story - 'बाबा का ढाबा'नंतर आणखी एक आजोबा सोशल मीडियावर हिट; औषधी वनस्पतींचा खप दुप्पट

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 October 2020

सोशल मीडियामुळे रातोरात स्टार होणाऱ्यांची संख्या बरीच मोठी आहे. काही दिवसांपूर्वी बाबा का ढाबा चालवणाऱ्या कांता प्रसाद यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर बाबा का ढाबाची लोकप्रियता वाढली आणि त्याचा फायदासुद्धा कांता प्रसाद यांना झाला. 

बेंगळुरू - सोशल मीडियामुळे रातोरात स्टार होणाऱ्यांची संख्या बरीच मोठी आहे. काही दिवसांपूर्वी बाबा का ढाबा चालवणाऱ्या कांता प्रसाद यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर बाबा का ढाबाची लोकप्रियता वाढली आणि त्याचा फायदासुद्धा कांता प्रसाद यांना झाला. आताही असाच एक फोटो 79 वर्षीय रेवन्ना सिदप्पा यांचा व्हायरल होत आहे. सिदप्पा रस्त्याशेजारी औषधी वनस्पतींची रोपे विकतात. त्यांचा फोटो व्हायरल झाल्यानतंर विक्रीमध्ये दुप्पट वाढ झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. 

रेवन्ना सिदप्पा रस्त्याच्या शेजारी उभा राहून औषधी वनस्पती विकायचे. त्यांचा एक फोटो व्हायरल झाल्यानंतर काही स्थानिकांनी त्यांना एक टेबल, खुर्ची आणि छत्री दिली. सिदप्पा यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं की, मी 79 वर्षांचा आहे आणि कनकपुरा रस्त्यावर औषधी वनस्पती विकत होतो. कोणीतरी माझा फोटो काढला आणि व्हायरल केला. 

फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक लोकांनी सिदप्पा यांना मदत केला. रोपं ठेवण्यासाठी एक लहानसा टेबल दिला. त्यासोबत खुर्ची आणि सावलीसाठी छत्रीही दिली. सुरुवातीला मी जास्ती जास्त पाच झाडं विकत होतो. आता हीच संख्या दुप्पट झाली आहे असं सिदप्पा यांनी सांगितलं. 

सिदप्पा 20-30 रुपयांना औषधी वनस्पतींचे रोपटे विकतात. त्यांनी म्हटलं की, मी गेल्या तीन वर्षांपासून हे काम करतोय. माझ्या खर्चासाठी कोणाकडून कर्ज घ्यायचं नाही. स्वत:च्या जीवावर कमवायचं आहे. कर्ज घेताना चांगलं वाटतं पण त्याची परतफेड करणं मोठं काम असतं. 

हे वाचा - #Positive Story - भीक मागणं सोडून दिव्यांग महिलेनं सुरू केला फळविक्रीचा व्यवसाय

याआधी दिल्लीतील मालवीय नगर इथं रस्त्याशेजारी लहानसा ढाबा चालवणाऱ्या 80 वर्षीय कांता प्रसाद आणि त्यांची पत्नी बादामी देवी यांचा फोटो व्हायरल झाला होता. लॉकडाऊनमध्ये त्यांना उदरनिर्वाह करण्यापुरते पैसेही मिळत नव्हते. मात्र एका फूड ब्लॉगरने बाबा का ढाबाचा व्हिडिओ केला आणि सोशल मीडियावर टाकला. या व्हिडिओमध्ये बाबा रडताना दिसत होते. ब्लॉगरने लोकांना आवाहन केलं होतं की, एकदा बाबा का ढाबा इथं खाण्यासाठी जरूर या. त्यानंतर रातोरात त्यांना प्रसिद्धी मिळाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: roadside sapling seller s sales double after viral photo