'जावईबापूं'ची जमीन खरेदी पुन्हा वादात

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 29 एप्रिल 2017

हे कुटुंब आहे की जमिनीचे व्यवहार करणारी एखादी कंपनी आहे, याबद्दल संशय येतो. यांच्या अशा प्रकारांमुळेच कॉंग्रेसकडे आज प्रचंड जमीन असली तरी यांच्या पायाखालची राजकीय जमीन मात्र निसटली आहे.
- संबीत पात्रा, प्रवक्ते, भाजप

पन्नास कोटींचा नफा कमावल्याचा वद्रांविरुद्ध आरोप

नवी दिल्ली: कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई आणि प्रियांका वद्रा यांचे पती रॉबर्ट वद्रा यांनी खरेदी केलेल्या हरियानातील आणखी एका जमिनीवरून भाजप व कॉंग्रसमध्ये वाक्‌युद्ध पेटले आहे. या जमिनीच्या खरेदीत वद्रा यांनी 50 कोटींचा नाफा कमावला व पर्यायाने गैरव्यवहार केल्याचा आरोप असून कॉंग्रसने पुन्हा सत्तारूढ नेतृत्वावर सूडचक्र चालविल्याचा आरोप केला आहे.

भाजपने मात्र कायदा आपले काम करेल, असे सांगून प्रियांका वद्रा यांच्या संभाव्य राजकारण प्रवेशाबाबत सूचक इशारा दिला आहे. हे "सिलेक्‍टिव्ह लीक' असल्याचा कॉंग्रेसचा आरोप आहे. वद्रा यांच्यामुळे कॉंग्रेस नेतृत्व पुन्हा दोषारोपांच्या पिंजऱ्यात उभे असल्याचे चित्र आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टक्कर देण्यासाठी कॉंग्रेस प्रसंगी प्रियांका यांच्या रूपाने हुकमाचा पत्ता बाहेर काढण्याचीही चर्चा आहे. यासाठी कॉंग्रेस अध्यक्षा अजूनही तयार नसल्या तरी पक्षनेते आपल्या अस्तित्वासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर 2019 ची तयारी करणाऱ्या भाजपने प्रियांका यांचे चर्चित पती रॉबर्ट वद्रा यांचे नवे प्रकरण समोर आणल्याचे बोलले जाते. ज्या एस. एन. धिंग्रा चौकशी समितीच्या हवाल्याने ताजे वृत्त प्रसिद्ध झाले आहे ती समितीही हरियानाच्या भाजप सराकरनेच नेमली होती हे लक्षणीय मानले जाते.

प्रियांका यांनी 11 वर्षापूर्वी फरिदाबाद जिल्ह्यात अमीपूर गावातील पाच एकर शेतजमीन "खरेदी' केली होती व यात त्यांनी "डीएलएफ' कंपनीकडून असलेल्या हिश्‍शाचा पैसा वापरला असे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर कॉंग्रेसन हे सूडचक्र असल्याचा आरोप केला. खुद्द प्रियांका यांनी या खरेदीत वद्रा यांच्या कंपन्यांचा सबंध नाही व आपल्याला आजीकडून (इंदिरा गांधी) वारशात मिळालेला पैसा आपण त्यासाठी वापरला असा दावा केला. यात वद्रा यांच्या "डीएलएफ' किंवा "स्टारलाईट' या कंपन्यांचा पैसा वापरला गेला नाही असा दावाही त्यांनी केला आहे. मात्र प्रियांका यांना खुलासा करावा लागल्यावर भाजप आक्रमक झाला आहे. केद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी, हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगतानाच कायदा आपले काम करेल व सत्य जगासमोर येईल, असे म्हटले आहे. यात सूडाचा काही भाग असल्याचे नक्वी यांनी नाकारले व काही गैरव्यवहार असेल तर चौकशी केली जाईलच असेही सूचकपणे सांगितले.

Web Title: robert vadras land issue