वैष्णोदेवीतील रोप-वे, हेलिकॉप्टरसेवा स्थगित

पीटीआय
बुधवार, 23 जानेवारी 2019

जम्मू : खराब हवामान आणि हिमवृष्टीमुळे वैष्णोदेवीला जाण्यासाठीची रोप-वे आणि हेलिकॉप्टरसेवा मंगळवारी स्थगित करण्यात आली. तसेच, काश्‍मीर, हिमाचल प्रदेशमध्येही हिमवृष्टी झाल्याने वातावरण गारठले आहे. हिमाचलमध्ये पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांनी हिमवृष्टीचा आनंद घेतला. 

जम्मू : खराब हवामान आणि हिमवृष्टीमुळे वैष्णोदेवीला जाण्यासाठीची रोप-वे आणि हेलिकॉप्टरसेवा मंगळवारी स्थगित करण्यात आली. तसेच, काश्‍मीर, हिमाचल प्रदेशमध्येही हिमवृष्टी झाल्याने वातावरण गारठले आहे. हिमाचलमध्ये पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांनी हिमवृष्टीचा आनंद घेतला. 

काश्‍मीरमध्ये त्रिकुटा पर्वतरांगेत वसलेल्या माता वैष्णोदेवी मंदिर परिसरात यंदाच्या हंगामातील पहिला हिमवर्षाव झाला. यामुळे भाविकांसाठीची रोप-वे सेवा आणि हेलिकॉप्टर सेवा आज बंद ठेवण्यात आली. त्रिकुटा पर्वतरांगेतील भवन, भैरव घाटी, संजीचाहत, हिमकोटी या या मार्गावर हिमवृष्टीची नोंद झाली. हिमवृष्टी होत असतानाही गेल्या चोवीस तासांत 12 हजारांहून भाविकांनी माता वैष्णोदेवीचे दर्शन घेतले. 

काश्‍मीर खोरे गारठले 

जम्मू-काश्‍मीरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून हिमवृष्टी होत आहे. त्यामुळे खोऱ्यातील तापमान नीचांकी पातळीवर पोचले आहे. श्रीनगरला काल रात्री उणे 0.2 इतके तापमान नोंदले गेले. काझीगुंड येथे उणे 0.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. येथून जवळच असलेल्या कोकनर्ग शहरात उणे 0.3 अंश तापमान होते. कुपवाडातही तापमानात घसरण झाली. काश्‍मीरमधील कारगिल हे सर्वांत थंड ठिकाण ठरले असून, तेथे उणे 6.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. गुलमर्ग, पहेलगाम येथेही शून्याखालीच तापमान नोंदले गेले. 

हिमवृष्टीमुळे सिमला, मनालीत पर्यटकांत उत्साह 

हिमाचल प्रदेशची राजधानी सिमला आणि अन्य पर्यटनस्थळी मनाली, कुफ्री, नारकंदा येथे प्रचंड हिमवृष्टीची नोंद झाली. मंगळवारी पहाटेच्या वेळी हिमाचलच्या पर्वतरांगात हिमवृष्टी झाल्याचे वेधशाळेने सांगितले. सिमला येथे आज सकाळी नऊच्या सुमारास 5 सेंटीमीटरची बर्फवृष्टी झाली. याशिवाय आज सकाळी 8.30 पर्यंत मनाली येथे 5 सेंटीमीटर, कोठी येथे 20 सेंटीमीटर, सलोनी येथे 6 सेंटीमीटर, कल्पना येथे 7.4 सेंटीमीटर बर्फवृष्टीची नोंद झाली. हिमवृष्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने सिमल्यातील मॉल रोडवर आले होते. तसेच, धर्मशाळा, कांग्रा, पालमपूर, खेरी, बंजर, कसोली, धर्मपूर येथे पावसाची नोंद झाली. बुधवारीही हिमवृष्टीची शक्‍यता वेधशाळेने वर्तविली. 

Web Title: Rope Way helicopter service suspended in Vaishnodevi