निवडणुकीपासून संघ चार हात दूरच !

वृत्तसंस्था
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

संघ कधीही निवडणुकीबाबतची थेट सर्वेक्षणे करत नसला तरी गावपातळीपर्यंतच्या प्रचारकांच्या मार्फत मिळविलेलेले फीडबॅक उत्तर प्रदेशात 2014 ची पुनरावृत्ती होणे अशक्‍य असल्याचे सांगत आहेत. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, यंदा उत्तर प्रदेशातील सत्तेची किल्ली ही आर्थिकदृष्ट्या सर्वांत गरीब असलेल्या वर्गांच्या हाती असेल.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील रणधुमाळीपासून चार हात दूर राहण्याचे धोरण ठेवणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपमधील एक से एक सशक्त बंडखोरांची समजूत काढण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र, संघाने यापलीकडे मोदीप्रणीत भाजपला साह्य करण्याबाबत अलिप्तता स्वीकारली आहे.

उत्तर प्रदेशात भाजपला निर्भेळ बहुमत मिळण्याची आशा नसल्याचे संघाने केलेल्या सर्वेक्षणात समोर आल्याचे वृत्त आहे. यातील सर्वेक्षणाची बाब संघाने नाकारली, तरी भाजप सत्तेपर्यंत पोचणे कठीण असल्याचे मान्य केले आहे.

गोरगरीब, रोजंदारी मजूर, शेतकरी व शेतमजूर हा वर्ग कसे मतदान करतो त्यावरच ते अवलंबून असेल. नोटाबंदीनंतर नेमक्‍या याच वर्गाचे हाल झाल्याचे संघाचे निरीक्षण ग्राह्य मानायचे, तर मोदी यांचा भाजप सत्तेपासून फारच दूर राहणार असे दिसत आहे. मात्र, मुस्लिमवर्ग यंदा मतदानात फारसा सक्रिय राहणार नाही, असेही संघसूत्रांचे म्हणणे आहे. पहिल्या टप्प्यातील 73 जागांवरील मतदानातून ते स्पष्ट झाले आहे. हाच कल पुढे चालू राहिला तर त्रिशंकू विधानसभा व त्यातून भाजपला संधी असेही चित्र समोर येत आहे.

भाजपमधील प्रचंड बंडखोरीने यंदा पक्षनेतृत्वाला अस्वस्थ केले आहे. जवळपास सर्वच विधानसभा मतदारसंघांत भाजपमध्ये मोठी बंडखोरी झाली आहे. उत्तराखंडइतके नसले तरी "यूपी'मध्येही भाजपने आयाराम- गयारामांना मुक्त तिकिटे वाटल्याने पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता दुखावल्याचे संघ मान्य करतो. भाजप नेतृत्वाने सारे प्रयत्न केल्यावर याबाबत आता संघाला साकडे घातले आहे. यातील जे बंडखोर संघाच्या विचारधारेशी जोडलेले आहेत, त्यांच्याशी रूजवात करण्यासाठी संघाचे नेते शिवप्रकाश हे गेला आठवडाभर उत्तर प्रदेशात तळ ठोकून बसले आहेत.

Web Title: rss away from up polls