
भागवत यांच्या म्हणण्यानुसार, महात्मा गांधींनी म्हटलं होतं की, माझी देशभक्ती माझ्या धर्मातून येते.
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी शुक्रवारी नवी दिल्लीतील गांधी शांती प्रतिष्ठानमध्ये एका पुस्तकाचे प्रकाशन केले. भागवत यांच्या म्हणण्यानुसार, महात्मा गांधींनी म्हटलं होतं की, माझी देशभक्ती माझ्या धर्मातून येते. या वाक्याचा हवाला देत पुढे त्यांनी म्हटलं की, एक गोष्ट स्पष्ट आहे की, जर कुणी हिंदू असेल तर तो देशभक्त असेल. आणि हा त्याचा मूलभूत स्वभाव आणि चरित्र असेल. ‘Making of a Hindu Patriot: Background of Gandhiji’s Hind Swaraj’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभावेळी ते बोलत होते. हे पुस्तक ‘सेंटर फॉर पॉलसी स्टडीज’ या सामाजिक संशोधन केंद्रातर्फे जे के बजाज आणि एम डी श्रीनिवास यांनी लिहलं आहे. या पुस्तकात राष्ट्रपिता महात्मा गांधींचा उल्लेख 'हिंदू देशभक्त' असा केला गेलाय.
भागवत यांनी पुढे म्हटलंय की, हा एक प्रामाणिक शोधग्रंथ आहे. कष्टपूर्वक अभ्यास करुन हा लिहला गेलाय. गांधीजींनी म्हटलं होतं की माझी देशभक्ती धर्मातून येते. एक गोष्ट स्पष्ट आहे ती म्हणजे जर कुणी हिंदू असेल तर तो देशभक्त असेल. आणि हा त्याचा मूलभूत स्वभाव आणि चरित्र असेल. गांधीजी म्हणायचे की, माझा धर्म 'पंथ धर्म' नाही तर माझा धर्म सर्व धर्मांचा धर्म आहे. पुढे भागवत म्हणाले की, मतभेदांचा अर्थ फुटीरता नसते. एकतेमध्ये अनेकता, अनेकतेमध्ये एकता, हीच भारताची मूळ विचारसरणी आहे.
हेही वाचा - PM मोदी जगात सर्वाधिक मान्यता मिळालेले नेते; सर्व्हेमध्ये दावा
पुढे भागवत म्हणाले की, पाश्चात्य संस्कृतीने आपल्याला धर्मभ्रष्ट केले आहे पण, त्याचा दोष ब्रिटिशांना देऊन काय उपयोग? तुम्ही हिंदू होतात तरीही देश गुलाम बनला, कंगाल झाला. यासाठीच स्वत:तील दोष काढून टाकून स्वत:ला घडवले पाहिजे. गांधीजींना ‘स्वराज्या’च्या संकल्पनेत केवळ ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य नको होते, मूल्यांची पुनस्र्थापना अपेक्षित होती. परंपरागत ज्ञान भारताकडे आहे. गांधीजी ब्रिटीशांना तुम्ही इथून जा, आम्ही पुन्हा उभे राहू असं म्हणत असत. स्वातंत्र्यसंग्राम हा दोन संस्कृतींमधील संघर्षही होता.
एक हजार पानांचे हे पुस्तक मुख्यत: गांधीजींच्या 1891 ते 1909 च्या दरम्यान लिहलेल्या लेखांवर आधारित आहे. यामध्ये त्यांनी गुजराती भाषेत स्वत:च्या हातांनी लिहलेला मजकूर देखील आहे.