केरळमध्ये आरएसएसच्या कार्यालयाची तोडफोड

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 मे 2017

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कन्नूर जिल्ह्यातील पेरुंथत्तील गावातील कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. ही तोडफोड मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (सीपीएम) कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप संघासह भारतीय जनता पक्षाने केला आहे.

कन्नूर (केरळ) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कन्नूर जिल्ह्यातील पेरुंथत्तील गावातील कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. संघासह भारतीय जनता पक्षाने ही तोडफोड मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (सीपीएम) कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप केला आहे.

सोमवारी सकाळी दहा जणांनी संघाच्या कार्यालयात प्रवेश केला. त्यांनी खिडक्‍या तोडल्या आणि कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली. त्यावेळी कार्यालयात असलेल्या एका महिलेला आणि बालकाला धमकावण्यात आले. विशेष म्हणजे रविवारीच या कार्यालयाचे उद्‌घाटन झाले होते. संघाचे दिल्लीतील प्रांत प्रचार प्रमुख राजीव तुली यांनी या प्रकाराबाबत प्रसिद्धपत्रकाद्वारे माहिती दिली आहे. त्यामध्ये संघाची बाजू मांडण्यात आली आहे. सीपीएमचे वर्चस्व असलेल्या पसिरात संघाने केशव स्मृती सेवालय नावाने सुरू केलेल्या कार्यालयावर हल्ला झाला. या कार्यालयात मदत कक्ष, रोजगार विभाग, ग्रंथालय याशिवाय अन्य काही सुविधा आहेत. या कार्यालयाच्या भूमिपूजन समारंभापासून आजपर्यंत तब्बल 18 वेळा हल्ला केला आहे. पेरुंथत्तील गावात 'सीपीएम पक्षाच्या गावात आपले स्वागत आहे', 'हा संघमुक्त परिसर आहे', 'येथे संघाला बंदी आहे' असे पोस्टर गावात लावण्यात आल्याचे तुली यांनी सांगितले आहे.

या परिसरात सीपीएमशिवाय अन्य कोणत्याही पक्षाला कोणत्याही प्रकारचा राजकीय-सांस्कृतिक कार्यक्रम घेऊ दिला जात नाही.

Web Title: RSS office in Kerala vandalized a day after its inauguration by alleged CPM goons