शेतकरी, दलितांची नाराजी भोवणार?; संघाचा इशारा

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 17 जून 2018

सरकारची प्रतिमा डागाळतेय
सूत्रांनी "सकाळ'ला सांगितल्यानुसार, मोदी सरकारच्या योजनांबाबत संघ संतुष्ट असला, तरी त्यांच्या अंमलबजावणीबाबत चांगले फीडबॅक संघवर्तुळातूनही मिळालेले नाहीत. केंद्रासह राज्याराज्यांतील भाजप सरकारांबाबतची प्रतिकूल भावना, शेतकरी व दलितांमधील नाराजी व दहशतीचे वातावरण, महाराष्ट्रासह अनेक भाजप राज्यांत दलितांवरील वाढते प्राणघातक हल्ले व ते रोखण्यात भाजप सरकारांना आलेले संपूर्ण अपयश या साऱ्या बाबी सूरजकुंड मंथनाच्या निमित्ताने भाजप नेतृत्वाच्या कानावर घालण्यात आल्या. मोदी सरकारच्या एकूणच प्रतिमेबद्दल संघात काळजीचे वातावरण असल्याचे सूत्रांनी मान्य केले.

नवी दिल्ली : भाजपशासित तीन राज्यांच्या आगामी निवडणुका व 2019ची लोकसभा निवडणूक या पार्श्‍वभूमीवर सतारूढ भाजपच्या नेतृत्वाला "संघ'म्‌ शरणम्‌ गच्छामी पवित्रा घेणे भाग पडल्याचे चित्र दिसते आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही भाजपला, "उत्तम समन्वय आवश्‍यक' असल्याचा व ग्रामीण भारतासह दलितांमधील संतप्त भावनेबद्दल सावधानतेचा इशारा दिल्याची माहिती आहे.

दिल्लीजवळच्या सूरजकुंड येथील संघाच्या तीन दिवसांच्या बैठकीत भाजप अध्यक्ष अमित शहा आज दाखल झाले. संघाची तीन दिवसांची वार्षिक बैठक सूरजकुंड येथे सुरू आहे. विरोधकांची महाआघाडी दृष्टिपथात असताना त्याला प्रत्युत्तर म्हणून संघ व भाजपमधील समन्वय अगदी गावपातळीपर्यंत चोख करण्यावर भर देण्यात येत आहे. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भोजनाच्या निमित्ताने संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी व समन्वयक कृष्णगोपाल यांच्याबरोबर खलबते केल्यावर शहा यांच्या आजच्या भाषणाची रूपरेषा भाजप नेतृत्वाने निश्‍चित केली.

या बैठकीत संघाने भाजपमध्ये पेरलेले राज्याराज्यांतील संघटनमंत्री व संघाच्या विविध संघटनांचे प्रमुख सहभागी झाले आहेत. येत्या वर्षात राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. त्यातील दोन राज्यांत भाजप संकटात असल्याचे फीडबॅक आल्याने भाजप व संघनेतृत्व दक्ष झाले आहे.

सरकारची प्रतिमा डागाळतेय
सूत्रांनी "सकाळ'ला सांगितल्यानुसार, मोदी सरकारच्या योजनांबाबत संघ संतुष्ट असला, तरी त्यांच्या अंमलबजावणीबाबत चांगले फीडबॅक संघवर्तुळातूनही मिळालेले नाहीत. केंद्रासह राज्याराज्यांतील भाजप सरकारांबाबतची प्रतिकूल भावना, शेतकरी व दलितांमधील नाराजी व दहशतीचे वातावरण, महाराष्ट्रासह अनेक भाजप राज्यांत दलितांवरील वाढते प्राणघातक हल्ले व ते रोखण्यात भाजप सरकारांना आलेले संपूर्ण अपयश या साऱ्या बाबी सूरजकुंड मंथनाच्या निमित्ताने भाजप नेतृत्वाच्या कानावर घालण्यात आल्या. मोदी सरकारच्या एकूणच प्रतिमेबद्दल संघात काळजीचे वातावरण असल्याचे सूत्रांनी मान्य केले.

मोदींचे संघाच्या नेत्यांबरोबर भोजन
गेली चार वर्षे नागपूरच्या संघभूमीवर जाणे टाळणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रात्री संघाच्या वरिष्ठ नेत्यांसाठी दिल्लीच्या निवासस्थानी जेवणावळीचे आयोजन केले होते. या वेळी शहा, गृहमंत्री राजनाथसिंह, राष्ट्रीय संघटनमंत्री रामलाल यांच्यासह तीन राज्यांतील अनेक प्रचारक नेते हजर होते. मोदींची ही डीनर डिप्लोमसी हे भाजप नेतृत्वाचे विमान जमिनीवर उतरू लागल्याचे चिन्ह मानले जाते.

Web Title: RSS warns BJP on farmer and dalits