नोटांसाठी दाही दिशा... 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 12 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - देशातील काळे धन नष्ट करण्यासाठी केंद्र सरकारने हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर आता नव्या नोटा मिळविण्यासाठी सर्वसामान्यांना मोठी धावपळ करावी लागत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी नव्या नोटा मिळविण्यासाठी लोकांना बॅंका, टपाल कार्यालये आणि "एटीएम' मशिनसमोर ताटकळ उभे राहावे लागले. देशभर अक्षरश: आर्थिक आणीबाणीसदृश स्थिती निर्माण झाली असून बाजारपेठा, रुग्णालये, बस स्थानकांवर नागरिकांना नोटांच्या व्यवहारासाठी मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

नवी दिल्ली - देशातील काळे धन नष्ट करण्यासाठी केंद्र सरकारने हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर आता नव्या नोटा मिळविण्यासाठी सर्वसामान्यांना मोठी धावपळ करावी लागत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी नव्या नोटा मिळविण्यासाठी लोकांना बॅंका, टपाल कार्यालये आणि "एटीएम' मशिनसमोर ताटकळ उभे राहावे लागले. देशभर अक्षरश: आर्थिक आणीबाणीसदृश स्थिती निर्माण झाली असून बाजारपेठा, रुग्णालये, बस स्थानकांवर नागरिकांना नोटांच्या व्यवहारासाठी मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

दरम्यान, मुंबईमध्ये नव्या नोटांसाठी रांगेमध्ये उभ्या राहिलेल्या एका 73 वर्षीय वृद्धाला आपले प्राण गमवावे लागले, तर केरळमध्येही दोन नागरिकांचा मृत्यू झाला. नव्या नोटांअभावी दैनंदिन व्यवहार ठप्प झाले असून, आता सामान्य माणसाचा संयम सुटू लागला आहे. 
 

नोटाबंदीची घोषणा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशी रवाना झाल्यानंतर येथील परिस्थिती सावरताना भाजपश्रेष्ठींच्या नाकीनऊ आले आहेत. पक्षाध्यक्ष अमित शहा यांना रोज सारवासारव करावी लागत असून मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेनेही नोटाबंदीवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. बॅंक कर्मचाऱ्यांना जनतेच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. 

सराफी व्यावसायिक धास्तावले 
प्राप्तिकर विभागाने गुरुवारी देशभर छापे टाकल्याने धास्तावलेल्या दिल्लीमधील सराफी व्यावसायिकांनी आज त्यांची दुकाने बंद ठेवली होती. सध्या प्राप्तिकर विभाग सोने व्यापाऱ्यांच्या संशयास्पद व्यवहारांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. काही बडे व्यापारी आणि हवाला ऑपरेटर्स हे बेकायदेशीरपणे सूट देऊन जुन्या नोटा घेत असल्याची माहिती प्राप्तिकर विभागास मिळाली आहे. केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी आज सुमारे 25 शहरांतील 600पेक्षा अधिक सराफा व्यावसायिकांना सोनेविक्रीची सविस्तर माहिती सादर करण्यासंबंधी समन्स बजावले आहे. 

"रुपे' कार्डच्या वापरात वाढ 
विविध दुकाने, रिटेल आउलेट्‌स येथे "रुपे कार्ड'च्या वापरात आज अचानक मोठी वाढ नोंदविली गेल्याचे "नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन'ने म्हटले आहे. मागील दोन दिवसांमध्ये "रुपे कार्ड'च्या वापराचे प्रमाण दुप्पट झाल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, जुन्या नोटा रद्दबातल करण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाचे आंतरराष्ट्रीय नाणे निधीनेही स्वागत केले आहे. 
 

राहुल गांधी बॅंकेत 
कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज नव्या नोटा मिळवण्यासाठी थेट "स्टेट बॅंक ऑफ इंडिया'च्या संसद शाखेमध्ये धाव घेतली. या वेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. सरकारच्या या निर्णयामुळे लोकांना काय त्रास होतो आहे? याची पंतप्रधान मोदी यांना कल्पना नाही. येथे रांगांमध्ये करोडपती नाहीत, तर गरीब जनता उभी असल्याचे त्यांनी सांगितले. 
 

घाबरून न जाण्याचे केंद्राचे आवाहन 
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अर्थ मंत्रालयाने आज जनतेच्या कष्टाचा पैसा सुरक्षित असल्याची ग्वाही दिली, तर रिझर्व्ह बॅंकेने लोकांनी संयम ठेवावा. आमच्याकडे पुरेशी रोकड असल्याचे म्हटले आहे. देशभरातील सर्व बॅंका, "एटीएम मशिन्स' आणि टपाल कार्यालयांना सुरक्षा देण्याचे आदेश गृह मंत्रालयाने राज्य सरकारांना दिले आहेत. 
 

दिवसभरात 
बड्या शहरांत एटीएम मशिन्स अल्पावधीत रिकामी 
देशभरात "एटीएम मशिन्स', बॅंकांभोवती बंदोबस्त 
अनेक "एटीएम'मध्ये नव्या नोटांचा दुष्काळ 
"एटीएम' कार्ड वापरावरील अधिभार बॅंकांकडून रद्द 
दहा दिवसांत "एटीएम' सेवा पूर्ववत होणार 
लोकांकडून 53 हजार कोटी रुपये बॅंकांत जमा 
उत्पन्नापेक्षा अधिक रोकड भरल्यास दंड 
बिहारमध्ये आरोग्यसेवेवर प्रतिकूल परिणाम 

Web Title: run for to get new currency